मुंबई - 'मेड इन हेवन' या वेब सिरीजचा नवा कोरा सिझन प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला आहे. अनेकांनी हा शो पाहिल्यानंतर ट्विटरवर त्यांचे विचार शेअर केले आहेत. शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर यांचे मालिकेतील भूमिकेसाठी लोकांनी खूप कौतुक केले. त्यांच्या अभिनयासाठी आणि उत्कंठावर्धक कथानकासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी निर्मिती केलेली 'मेड इन हेवन' ही मालिका पहिल्यांदा २०१९ मध्ये रिलीज झाली आणि प्रेक्षकांची मने लगेचच जिंकली. २०२३ मध्ये चाहत्यांमध्ये मालिकेबद्दलची क्रेझ कायम ठेवली आहे. वेडिंग प्लॅनर्सची ही रंजक कथा अतिशय नाट्यमय पद्धतीने सादर करण्यात पुन्हा एकदा निर्माते आणि दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.
तारा खन्ना आणि करण मेहरा या 'मेड इन हेवन 2' वेडिंग प्लॅनर जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयाची नेटिझन्सकडून भरपूर प्रशंसा होत आहे. सध्याच्या विवाह समस्या, आधुनिक काळातील रीति रिवाज अशा कितीतरी गोष्टी या मालिकेत मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.
'मेड इन हेवन'चा दुसरा सिझन पहिला भाग जिथे संपला त्याच कथानकावरुन पुढे सुरू होतो. करण (अर्जुन माथूर) आणि तारा (शोभिता धुलिपाला) फ्लॅटमेट बनले आहेत आणि जौहरी (विजय राज) याने वेडिंग प्लॅनिंगच्या या कंपनीत मोठी हिस्सेदारी मिळवली आहे. कथेमध्ये आदिल (जिम सर्भ) तारापासून वेगळा झाला असून फैजा (कल्की कोचलिन) आदिलच्या जवळ येत आहे.