मुंबई - Akshay Kumar Shahrukh Khan and Ajay Devgan : गुटखा कंपन्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान उच्च न्यायालयानं पुढील कारवाईचा तपशील मागवला आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 9 मे 2024 ही तारीख निश्चित केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) 20 ऑक्टोबर रोजी शाहरुख खान, अक्षय कुमार यांच्यावर तंबाखू कंपन्यांची जाहिरात केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.
गुटखा कंपन्यांना प्रोत्साहन दिलं :गुटखा जाहिराती विरोधात वकील मोतीलाल यादव यांनी याचिका दाखल केली होती. गुटखा हे मोठ्या प्रमाणावर जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे भारत सरकारच्या पद्म पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या गुटख्याच्या प्रचारात कथित सहभागाचे मुद्दे उपस्थित केले होते. न्यायालयानं ऑगस्ट 2023 मध्ये कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना नोटिसाही बजावल्या होत्या. यात सप्टेंबर 2022 च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानाची कारवाई करण्याची मागणी केली होती. यामध्ये याचिकाकर्त्याला शुल्क आकारण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी केंद्र सरकारच्या वतीनं 16 ऑक्टोबरच्या नोटीसची प्रत सादर करत अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावली आहे.