हैदराबाद - टीव्ही आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राजू यांना राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना राजूला ह्रदयविकाराचा झटका आला. तो ट्रेडमिलवरून पडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलीकडेच अशाच प्रकारे अनेक सिनेक्षेत्रातील व क्रिडाक्षेत्रातील सेलेब्रिटींना ह्रदयविकाराचा समाना करावा लागला होता. फिटनेस प्रेमी असलेल्या राजू श्रीवास्तव यांना जसा जिममध्ये ह्रदयविकाराचा झटका आला तसाच त्रास भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीलाही झाला होता. सदैवाने यातून गांगुली पूर्ण बरे झाले आहेत.
२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होता. गांगुलीला ‘कार्डियक अरेस्ट’ सौम्य झटका बसल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
पुनीत राजकुमारलाही जिममध्ये हृदयविकाराचा झटका - प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या वृत्तानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनीत राजकुमारला सकाळी साडेअकरा वाजता जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला तातडीने बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच अशाच प्रकारे बॉलिवूडचा तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचाही लहान वयात हृदयविकाराने मृत्यू झाला.