मुंबई- सुंदर अभिनेत्री मौनी रॉयने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. अलिकडे प्रदर्शित झालेल्या तिच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाने यशाचा ध्वज फडकत ठेवला आहे. यातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. अशी ही सौंदर्यवती मौनी रॉय आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे झाला. मौनी रॉय बंगाली कुटुंबातील आहे. तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. मौनी रॉयने तिचे शालेय शिक्षण पश्चिम बंगालमधूनच पूर्ण केले आहे. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मौनी रॉयच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिने पत्रकार व्हावे. यासाठी तिने जामिया मिलिया इस्लामियाच्या मास कम्युनिकेश अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. मौनी रॉयला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तिने मास कम्युनिकेशनचे शिक्षण मधेच सोडले आणि ती मुंबईला आली. मौनी रॉय पहिल्यांदा अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांच्या 'रन' चित्रपटातील एका गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली होती.
मौनीने तिच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये लोकप्रिय टीव्ही शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मधून केली होती. त्यानंतर ती कस्तुरी, देवों के देव महादेव, नागिन, नागिन 2, नागिन 3, टशन-ए-इश्क, जुनून, ऐसी नफरत तो कैसा इश्क, कृष्णा चली लंडन, झलक दिखला जा 9, एक था राजा एक थी रानीमध्ये दिसली. पण कलर्स टीव्हीवरील 'नागिन' या मालिकेमुळे ती इतकी प्रसिद्ध झाली की ती घराघरात प्रसिद्ध झाली. 'देवों के देव महादेव'मधील मौनीच्या सतीच्या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली. पण तिला खरी ओळख नागिन या मालिकेमुळेच मिळाली.