मुंबई : LEO Advance Booking :लोकेश कनकराजचा 'लिओ' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मास्टर, कैथी आणि विक्रम सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या लोकेश कनकराजचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करू शकतो. दरम्यान चित्रपटाचा अंतिम आगाऊ बुकिंग रिपोर्ट समोर आला आहे, ज्यावरून असे दिसते की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग घेऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी कमाईमध्ये 'लिओ' 'जवान', 'पठाण', 'गदर 2' यासह सर्वच चित्रपटांना मात देईल. 'लिओ'चा पहिल्या दिवसाचा शो पाहण्यासाठी ऐतिहासिक आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे. 'लिओ' हा चित्रपट पहिल्या दिवशी 200 कोटींची कमाई करू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
'लिओ'चा आगाऊ बुकिंग अहवाल : 'लिओ'चा आगाऊ बुकिंग अहवाल खूप जोरदार आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाची सुमारे 2448746 तिकिटे विकली गेली. यासह या चित्रपटाचे 46.36 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. ही फक्त आगाऊ बुकिंगची कमाई आहे, ज्यामध्ये ब्लॉक सीट्सचा समावेश नाही. या चित्रपटाला तामिळनाडूतून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यानंतर तेलुगू, हिंदी आणि कन्नडमध्येही चांगले कलेक्शन पाहायला मिळत आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटानं शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठाण'ला यापूर्वीच मागे टाकले आहे. भारतात या चित्रपटानं आतापर्यत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची तिकिटे विक्री केली आहे.