Lata Mangeshkar Birth Anniversary: आपल्या मंत्रमुग्ध आवाजानं सारं विश्व व्यापून राहिलेल्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची आज 94 वी जयंती. लता मंगेशकर या सात शब्दातच संगीताची खरी जादू सामावलेली आहे. केवळ महाराष्ट्रच नाही संपूर्ण जगानं त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांची अनोखी जादू अनुभवली आहे. कित्येक पिढ्या त्यांची गाणी ऐकत मोठ्या झाल्या. संगीताच्या या सात सुरावटींवर हुकूमत गाजवणाऱ्या स्वराज्ञी लता दीदींनी आपले संपूर्ण आयुष्य गाण्यासाठीच वाहून घेतलं होतं. त्यांच्या या गानतपस्येला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम दिलं. अतिशय साधी रहाणीमान असलेल्या लता दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये इंदौर येथे जन्म झाला. नामवंत गायक आणि उत्कृष्ट अभिनेता असलेल्या दिनानाथ मंगेशकरांनी त्यांचं नाव हेमा असं ठेवलं होतं. पण त्यांच्या नाटकातील लतिका या पात्रावरुन छोट्या हेमाचं नाव लता असं ठेवण्यात आलं.
लहानपणापासूनच रियाज - वयाच्या केवळ पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे घेण्यास सुरूवात केली. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही सक्रिय होत्या. 1942 मध्ये लता मंगेशकर अवघ्या 23 वर्षांच्या असताना आजाराने मास्टर दीनानाथांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आली. घरची जबाबदारी घेऊन लता दीदी जिद्दीनं परिस्थितीला सामोरं गेल्या. कामाच्या शोधात 1945 मध्ये संपूर्ण मंगेशकर कुटुंबानं मुंबई गाठली. त्यानंतर लता दीदींनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. याचवेळेस नवयुग चित्रपट फिल्म कंपनीचे मालक आणि दीनानाथ यांचे मित्र मास्टर विनायक यांनी मंगेशकर कुटुंबाला मदतीचा हात पुढं केला. लता दीदींनी 1942 मध्ये मास्टर विनायक यांच्या ‘पाहिली मंगला-गौर’ या मराठी चित्रपटात छोटी भूमिका दिली, ज्यामध्ये लतांनी एक गाणंही गायलं होतं.
पहिला मराठी चित्रपट 'किती हसाल’ - वयाच्या 13 व्या वर्षी लताजींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्या भारतीय सिनेसृष्टीला आपल्या आवाजानं अखेरपर्यंत मंत्रमुग्ध केलं. लता यांनी 1942 मध्ये मराठी चित्रपट ‘किती हसाल’ साठी 'नाचू या ना खेडे सारी, मनी हौस भारी' हे पहिले गाणे गायले. हे गाणे सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलं होतं. परंतु, चित्रपटाचे संकलन करताना हे गाणे काढण्यात आलं होतं. संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी ‘मजबूर’ या सिनेमातील ‘दिल मेरा तोडा, कहीं का ना छोडा’ हे गाणे गायला सांगितले. हे गाणं बऱ्यापैकी लोकप्रिय झालं. दीदींनी एका मुलाखतीत गुलाम हैदर यांना आपले ‘गॉडफादर’ असल्याचं म्हटलं होतं.
1000 हून अधिक हिंदी चित्रपटात गायन - लतादीदींनी आपल्या कारकीर्दीत 7 दशकांमध्ये1000 हून अधिक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. तर 36 हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आहे. 2001 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय, 1969 मध्ये ‘पद्मभूषण’, 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि 1999 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.
लतादीदींची काही लोकप्रिय गाणी
1) प्यार किया तो डरना क्या (मुघल ए आझम)
2) कहीन जीप जले कहीन दिल (बीस साल बाद)
3) अल्लाह तेरो नाम (जयदेव)
4) बिंदीया चमकेगी (दो रास्ते)
5) चलते चलते (पाकीझा)
6) सत्यम शिवम सुंदरम (सत्यम शिवम सुंदरम)
7)कुछ ना कहो ( 1942 अ लव्ह स्टोरी)
8) ए दिल ए नादान (रझिया सुलतान)
लता दीदींनी मधुबालापासून ते प्रिटी झिंटापर्यंत अनेक अभिनेत्रींना आवाज दिला. त्यातील निवडक काही अभिनेत्री आणि त्यांचे हीट झालेले चित्रपट
1) मधुबाला - प्यार किया तो डरना, आएगा आनेवाला, प्यार किया तो डरना क्या
2) मीना कुमारी - परिणीता, साहेब बिवी और गुलाम
3) नर्गिस - मदर इंडिया, छोरी - छोरी, आन, श्री 420
4) नूतन - सरस्वतीचंद्र, बंदिना, तेरे घर के सामने