मुंबई - Lalit Prabhakar drove the bus : कलाकारांना आपली भूमिका साकारताना बरीच तयारी करावी लागते. भूमिकेनुसार वजन कमी जास्त करणे हे बऱ्याच कलाकारांना जमवून घ्यावे लागतं. तसंच निरनिराळी शस्त्रं चालवणं, मार्शल आर्टस् शिकणं, भाषा आणि त्याच्या लहेजाचा अभ्यास करणे हे कॉमन झालं आहे. शूटिंग करताना कार चालवणं जवळपास सक्तीचे झालं आहे. परंतु अभिनेता ललित प्रभाकरने एक पाऊल पुढे जात चक्क बस चालवली. अर्थात ती भूमिकेची गरज होती. ललित प्रभाकरने 'शांतीत क्रांती २' साठी बस चालवायला शिकून शॉट दरम्यान ती चालवली देखील. त्याच्या मते, पहिल्यांदाच बस चालवण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.
'शांतीत क्रांती' ही मराठी वेब सिरीज मैत्रीवर आधारित असून रोड ट्रीप सिरीज आहे. त्याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला त्यामुळे साहजिकच त्याचा दुसरा सिझन येतोय. पहिल्या सिझनमधील प्रेक्षकांचे आवडते श्रेयस, प्रसन्न व दिनार आता नवीन ऍडव्हेंचर करताना दिसणार आहे. यात ललित प्रभाकर, अलोक राजवाडे आणि अभय महाजन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील. पडद्यावर मनोरंजक गोष्टी दिसतातच, परंतु बऱ्याचदा पडद्यामागे देखील काही आगळ्या वेगळ्या गोष्टी घडत असतात. प्रसन्नची भूमिका साकारणाऱ्या ललित प्रभाकरने चक्क बस चालवली.
त्याचं झालं असं की, एका सीनसाठी ललितला बस चालवायची होती. मोठी बस चालवण्याचे टेक्निक वेगळं असतं. तरीही त्याने नकार दिला नाही. त्याला बॉडी डबल नक्कीच मिळाला असता. परंतु त्या सीनची ऑथेन्टिसिटी कमी झाली असती. म्हणून मग त्याने एक्सपर्ट कडून थोडे प्रशिक्षण घेतलं आणि स्वतः बस चालवली, तीही गजबजलेल्या रस्त्यावर. महत्वाचं म्हणजे त्याला बस चालवताना संवादही म्हणायचे होते तेही सीनच्या मागणीप्रमाणे. कोणालाही इजा न होता त्याने बस चालवत सीन पूर्ण केला तेव्हा सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
बस चालवण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना ललित प्रभाकर म्हणाला की, 'मी जीवनात पहिल्यांदाच ड्रायव्हर बनत बस चालवण्याचा अनुभव घेतला. तो अभूतपूर्व असा क्षण होता. त्यात बस चालवताना अभिनय करायचा होता, बरेच संवाद म्हणायचे होते. या सर्वात सुसूत्रता आणणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. हे कमी की काय म्हणून ती बस गजबजलेल्या रस्त्यावर चालवायची होती. थोडं दडपण नक्की होतं. पण दिग्दर्शकानं ऍक्शन म्हटलं आणि माझ्या नकळत सराईतपणे बस चालवू लागलो. सर्वजण आश्चर्यचकित झाले, मी पण. अर्थात आमच्या टीमने सर्व सुरक्षिततेची काळजी घेतली होती आणि सर्वांनी मला प्रोत्साहित केलं. त्यामुळे हे शक्य होऊ शकलं. हा एक अत्यंत अनोखा अनुभव होता, जो सदैव माझ्या स्मरणात राहील.'