मुंबई - KWK 8 : चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्याच्या टॉक शो 'कॉफी विथ करण'साठी देखील चर्चेत असतो. करण सध्या 'कॉफी विथ करण'चा 8वा सीझन होस्ट करत आहे. यावेळी करण जोहरच्या या शोमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाची स्टार कास्ट सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन आले होते. 'कॉफी विथ करण सीझन 8' या शोचा 5 वा एपिसोड डिस्ने प्लस हॉट स्टारवर आज प्रसारित होणार आहे. दरम्यान या शोमध्ये वरुण आणि सिद्धार्थनं त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात आलिया भट्टच्या कास्टिंगच्या विरोधात सिद्धार्थ आणि वरुण होते, असं आता उघडकीस आलं आहे.
वरुण-सिद्धार्थ आलियाच्या कास्टिंगच्या विरोधात :वरुण आणि सिद्धार्थनं 2012 मध्ये करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आलिया भट्टसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता 'कॉफी विथ करण'मध्ये दिसलेल्या या दोन कलाकारांबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. करण जोहरनं सांगितले, की 'सिद्धार्थ आणि वरुणला चित्रपटात आलिया भट्टला कास्ट करू द्यायचं नव्हतं. पुढं त्यानं म्हटलं, 'मला अजूनही आठवतंय की आलिया भट्ट पहिल्यांदा आमच्यासमोर आली तेव्हा तुम्हा दोघांनी मला मेसेज केला होता, की तुम्ही तिला चित्रपटात कास्ट करू शकत नाही. तुमच्यापैकी कोणीतरी मला म्हटलं होत की ती खूपच यंग दिसत आहे. पण जेव्हा आम्ही तीन महिन्यांनी फोटोशूट केले, तेव्हा आलिया खूप शांतपणे उभी होती. तिनं तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही दोघेही मला आधीच ओळखत होते, पण ती मला अजिबात ओळखत नव्हती. जेव्हा तिनं पहिला शॉट दिला तेव्हा, तेव्हा तिला कास्ट करण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. असं मला समजलं'