नवी दिल्ली - Kriti Sanon National Award : अभिनेत्री क्रिती सेनॉनला तिच्या अभिनय कारकिर्दीतला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळ्यामुळे तिचा आनंद गगनाला भिडलाय. क्रितीला ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'मिमी' चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या चित्रपटात तिनं सरोगेट आईची भूमिका साकारली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते क्रितीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर क्रितीने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या प्रतिष्ठेच्या सोहळ्याला ती तिच्या आई-वडीलांसह उपस्थित होती. क्रितीने तिच्या आई आणि वडिलांसोबतचे फोटो अपलोड केले आहेत. एका फोटोमध्ये ती तिच्या पालकांच्या कुशीत बसून पदक आणि प्रमाणपत्र दाखवताना दिसतेय.
'या क्षणाचं वर्णन शब्दात करणं सोपं नाही. माझ्यासाठी आजचा दिवस आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवसांपैकी एक आहे!' असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय. आणखी एका पोस्टमध्ये राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठी ती स्टेजवर गेल्यापासूनचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. 'खूप महत्त्वाचा क्षण!!! दिनो आणि लक्ष्मण उत्तकर, तुमची खूप खूप आठवण आली!!', असं तिनं या पोस्टवर लिहिलंय.
'मिमी' चित्रपटाची कथा एका सरोगेट आई होण्यासाठी तयार झालेल्या तरुणीची आहे. ती परदेशी महिलेसाठी सरोगेट मदर होण्यासाठी तयार होते. मिळालेल्या या पैशातून तिला अभिनयाचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. मात्र मुलाची वाढ योग्य झाली नसल्याचा अंदाज येताच ते परदेशी जोडपं मुल स्वीकारण्यास नकार देतात. त्यानंतर मिमी स्वतः मुलाला वाढवण्याचा निर्णय घेते. त्यानंतर आई या नात्यानं सिंगल पेरेंट म्हणून तिला अनेक आव्हानाला आणि सामाजिक दबावांना सामोरं जावं लागतं. एक आई म्हणून तिचा प्रवास, अनेक संकटांना तोंड देताना आपल्या मुलाचा सांभाळ करण्याची तिची धडपड हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अशीच आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. क्रितीच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. कामाच्या आघाडीवर क्रिती सेनॉन आगामी 'गणपत: अ हिरो इज बॉर्न' या एक्शन थ्रिलर चित्रपटात टायगर श्रॉफसोबतदिसणार आहे. तिच्या हातामध्ये 'द क्रू' आणि 'दो पट्टी' हे चित्रपट देखील आहेत.