मुंबई - Khushi Kapoor New movie :दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरनं अलीकडेच 'द आर्चिज'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. खुशीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे अनेकजणांनी खूप कौतुक केले. दरम्यान, खुशीच्या हातात आणखी एक मोठा चित्रपट लागला आहे. ती सारा अली खानचा भाऊ आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत रुपेरी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे. खुशी कपूरला झटपट ही संधी मिळाली आहे.
खुशी कपूर दिसेल इब्राहिम अली खानसोबत :मिळालेल्या माहितीनुसार इब्राहिम अली खान आणि खुशी यांनी एकत्र एक चित्रपट साइन केला आहे. या प्रोजेक्टचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. याशिवाय खुशीचा हा आगामी चित्रपट थेट डिजिटलवर प्रदर्शित होणार असल्याचेही बोलले जात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शाउना गौतम करणार आहे. सध्या निर्माते स्ट्रीमिंग अधिकारांसाठी आघाडीच्या ओटीटी प्लेयरशी चर्चा करत आहेत. या चित्रपटाबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या शाउना गौतमनं काही मोठ्या बॅनरच्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शनाचं काम केलं आहे.