मुंबई- अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिख समुदायाबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. पंजाबमध्ये ज्या हिंसक घटना काही दिवसापासून सुरू आहेत त्यापार्श्वभूमीवर कंगनाचे हे विधान आले आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने एक पोस्ट लिहिून आपण दोन वर्षापूर्वी केलेले भाष्य खरे ठरत असल्याचे म्हटलंय.
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'पंजाबमध्ये आज जे काही घडतंय त्याबद्दल मी दोन वर्षापूर्वीच भाकित केले होते, त्यावेळी अनेक केसेस माझ्यावर झाल्या. माझ्या गाडीवर पंजाबमध्ये हल्ला करण्यात आला, परंतु तेच घडले जे मी म्हटले होते. खलिस्तानी शिखांना आता त्यांची भूमिका निश्चित केली पाहिजे आणि हेतुही स्पष्ट केला पाहिजे,' असे कंगनाने म्हटलंय.
यापूर्वीही कंगनाने केले होते वादग्रस्त विधान - कंगनाने यापूर्वीही अनेकदा अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तिने दोन फोटो शेअर करुन खलिस्तानी आणि शीख यांच्यातील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाने यासोबत एक कमेंटही लिहिली होती पण नंतर तिने तिची पोस्ट डिलीट केली होती. या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले होते, 'खलिस्तानी ना शीख आहे ना शेतकरी. हे लोक लष्कर-ए-तैयबासारखे दहशतवादी आहेत. भारत सरकारने त्यांना दहशतवादी घोषित करावे. जर तुम्ही त्यांच्या बाजूने असाल तर तुम्हाला कळले पाहिजे की त्यांना काय हवे आहे... दहशतवाद आणि गृहयुद्ध...'