मुंबई - KH 234 : 'विक्रम' या चित्रपटानंतर कमल हासनच्या एकामागून एक चित्रपटांच्या घोषणा होताना दिसत आहेत. सध्या त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच मणिरत्नम यांच्या 'केएच 234'द्वारे (KH 234) रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तब्बल 36 वर्षांनंतर कमल हासन आणि मणिरत्नमची जोडी पडद्यावर खळबळ माजवणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना खूश करण्यासाठी, 7 नोव्हेंबर रोजी कमल हासनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, 'केएच 234' मधील त्याचा पहिला लूक रिलीज केला आहे. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलनं आज त्याच्या एक्स पेजवर कमल हासनचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
कमल हासन फर्स्ट लूक रिलीज : या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'जबदस्त कहाणीला आलिंगन द्या! शीर्षक व्हिडिओची घोषणा आज संध्याकाळी 5 वाजता होईल. अविस्मरणीय अनुभवासाठी सोबत रहा'. या चित्रपटामधील पोस्टरमध्ये कमल हासनचा संपूर्ण चेहरा कापडानं झाकण्यात आला आहे. त्याचे फक्त डोळे दाखवण्यात आले आहेत. या पोस्टरवर 'केएच 234' असं तात्पुरतं शीर्षक लिहिलं आहे. कमल हासनचा फर्स्ट लूक रिलीज केल्यानंतर काही वेळातच निर्मात्यांनी दुलकर सलमानचे देखील पोस्टर रिलीज केले. या पोस्टवर त्यांनी लिहिलं, 'या अनोख्या प्रवासात दुलकर सलमानसोबत काम करण्यास उत्सुक.' त्याच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. या चित्रपटाबाबत लवकरच काही गोष्टी समोर येणार आहेत, मात्र सध्या या चित्रपटासाठी चाहते खूप आतुर आहेत.