मुंबई Keemti song out : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा हे 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दरम्यान आता या चित्रपटामधील गाणं 'कीमती' आज 3 ऑक्टोबर रोजी रिलीज झालं. यापूर्वी 'जलसा 2.0' हे गाणं निर्मात्यांनी रिलीज केलं होतं. या गाण्याला खूप पसंती मिळाली होती. 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारनं त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू'मधील गाण्याची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या चित्रपटामध्ये अक्षयनं जसवंत सिंग गिलची भूमिका साकारली आहे, तर परिणीतीनं त्याची पत्नी निर्दोष कौर गिलची भूमिका साकारली आहे.
अक्षयनं केली गाण्याची झलक शेअर :अक्षय कुमारनं गाण्याची एक झलक शेअर करताना लिहिलं, 'प्रेम आणि अमूल्य, गाण्याचा व्हिडिओ आता आऊट. भारताच्या खऱ्या नायकाची कहाणी 'मिशन रानीगंज'सह 6 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात पाहा'.असं त्यानं आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. या चित्रपटाकडून अक्षयला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये अक्षय आणि परिणीती व्यतिरिक्त कुमुद मिश्रा, दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा, पवन मल्होत्रा, वीरेंद्र सक्सेना आणि शिशिर शर्मा यांच्याही भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. अक्षयनं टीझर शेअर करत लिहिले की, '1989 मध्ये एका व्यक्तीनं धैर्य आणि आत्मविश्वास दाखवला ज्यामुळं अनेक जीव वाचले! 'मिशन राणीगंज'चा टीझर आता रिलीज झाला आहे'. यासह त्यानं चित्रपटाची तारीख देखील शेअर केली होती.