मुंबई - Katrina On Tiger 3 Character : अभिनेत्री कतरिना कैफ 'टायगर 3' या आगामी चित्रपटामध्ये अॅक्शन-पॅक अवतारात दिसणार आहे. या चित्रपटातील नेत्रदीपक, साहसी अॅक्शन सीक्वेन्स करण्याण्यापूर्वी सुमारे दोन महिने तयारी केली होती. या चित्रपटात तिनं गुप्तहेर झोयाची भूमिका पुन्हा साकारली आहे.
या चित्रपटात कतरिनानं अनेक आश्चर्यकारक स्टंट्स आणि अॅक्शन सीन्स केले आहेत. टर्किश टॉवेल गुंडाळून केलेला हाणामारीचा एक सीन असाच अद्भूत आहे. ती साकारत असलेल्या झोया या व्यक्तिरेखेची ताकद दाखवणारी वैशिष्ट्ये सादर करण्यास सज्ज झालेल्या करतिनानं एका निवेदनात म्हटलंय की, 'टायगर 3 मध्ये दाखवण्यात आलंय की एक स्त्री आपले कुटुंबीय किंवा देश वाचवण्याचा जेव्हा मुद्दा येते तेव्हा तिच्यासाठी काहीच अशक्य असत नाही. झोया हे पात्र हे आपल्या मुलींचं संगोपन करणारं आहे पण तितकंच ती संरक्षक देखील आहे हे लोकांना सांगणं महत्त्वाचं आहे. झोया माझ्या करिअरमधील सर्वात प्रिय भूमिकांपैकी एक आहे.'
कतरिना पुढे म्हणाली, 'झोया आपल्या साहसी वृत्ती आणि धैर्यानं कोणाशीही बरोबरी करु शकते हे मला आवडतं. ती लढाईतून मागे हटत नाही आणि कृती करताना ती पुरुषापेक्षा सरस असू शकते. शत्रू सैन्यासोबत लढताना झोयाची स्टाईल अनोखी आहे आणि तिनं किती उत्तम अॅक्शन सीन्स सहजपणे केलेत हे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल. '
टायगर फ्रँचायझीसाठी आपण पुरेपूर मेहनत केली असल्याचं यावेळी करतिनानं म्हटलंय. ती म्हणाली, 'अॅक्शन ही मला स्टाईल म्हणून खूप आवडते. गुप्तहेराची भूमिका साकारणं हे एक स्वप्न होतं. मला माहित होतं की हा माझ्या वारशाचा एक भाग असणार आहे, म्हणून मी नेहमीच या फ्रँचायझीसाठी माझे 200 टक्के देते. प्रत्येक टायगर चित्रपटात झोयाची व्यक्तीरेखा आहे. यात तिनं चांगला लढा दिलाय. या पात्राचा असलेला लढाऊपणा हा युएसपी बनलाय, जो मला आवडतो.'