मुंबई : बॉलिवूडचा 'रूह बाबा' कार्तिक आर्यनने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दबदबा निर्माण केला आहे. कार्तिकचा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' आज म्हणजेच 29 जून रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने वर्चस्व गाजवले आहे. 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. याशिवाय ट्विटरवर प्रेक्षक या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. दरम्यान, चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही 'सत्यप्रेम की कथा' हा चांगला चित्रपट आहे असे त्यांनी सांगितले आहे. मनोरंजनच्या बाकी साइट्सनी देखील पुनरावलोकनांमध्ये चित्रपटाला चांगले स्टार दिले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाला मिळालेले यश पाहून कार्तिक आर्यन बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला आहे. यावेळी कार्तिकने गुलाबी रंगाचे शर्ट आणि डेनिमचा पॅन्ट परिधान केला आहे. या कॅज्युअल लूकमध्ये तो फार सुंदर दिसत आहे.
कार्तिक आर्यन पोहोचला सिद्धिविनायक मंदिरात :कार्तिक आर्यन हा आलिशान काळ्या कारमधून खाली उतरला आणि बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी थेट सिद्धिविनायक मंदिरात गेला. तसेच बाप्पाने त्याची इच्छा पूर्ण केल्याबद्दल त्याने आभार मानले. ईदला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची आता चांदी झाली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 7 ते 10 कोटींचा गल्ला जमवू शकतो असे बोलले जात आहे, मात्र शनिवार आणि रविवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा व्यवसाय करणार आहे हे मात्र निश्चित आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. याआधी ही हिट जोडी 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसली होती आणि या चित्रपटाने 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.