मुंबई - भूल भुलैया 2 या चित्रपटाला २०२२ मध्ये अभूतपूर्व यश मिळाले. कोविड नंतर प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात येण्यास भाग पाडलेल्या या चित्रपटाने २६० कोटींचा व्यवसाय केला होता. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची उत्तम केमेस्ट्री यात पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर याचा आगामी सिक्वेल नक्की येणार असल्याचे निर्मात्यांनी संकेत दिले आहेत.
भूल भुलैया ३ मध्ये पुन्हा एकदा कार्तिक आर्यन झळकणार असल्याची पुष्टीही निर्माता भूषण कुमार यांनी दिली आहे. कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी ही बातमी खास आनंदाची आहे. कारण भूल भुलैया २ जेव्हा बनला होता तेव्हा या सीक्वेलमध्ये पुन्हा अक्षय कुमार असेल असेच सर्वांना वाटले होते. मात्र त्याची जागा कार्तिकने घेतल्यानंतर चित्रपटाच्या यशाबद्दल अनेकांना संशय वाटत होता. असे असतानाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करुन बॉलिवूड अभी जिंदा है याची कोविड नंतर जगाला खात्री दिली होती.
भूल भुलैया ३ हा चित्रपट बनणार हे निश्चित मानले जात आहे. कार्तिक आर्यनने या चित्रपटाची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. रुह बाबा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. या चित्रपटात आत्मा कार्तिक आर्यनच्या शरिरात प्रवेश करणार आहे. एकंदरीतच एक धमाल हॉरर कॉमेडी चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करेल असेच टीझर पाहून वाटत आहे.