मुंबई - करण जोहरचा गाजलेल्या टॉक शो 'कॉफी विथ करण'च्या नव्या सिझनमध्ये अनेक कालाकारांनी हजेरी लावली आहे. मात्र करणनं अद्याप शाहरुख खानला आमंत्रित केलेलं नाही. तो करणच्या या शोमध्ये नियमितपणे हजेरी लावणारा कलाकार आहे. परंतु यावेळी त्यानं पाठ फिरवली आहे. याचं कारण सांगताना करण जोहरनं सांगितलं की योग्य वेळ असेल तेव्हा त्याच्याशी जरुर संपर्क साधेन.
'कॉफी विथ करण'शी संबंधित एका कार्यक्रमात बोलताना करण जोहरने शाहरुख सोबत असलेल्या घट्ट नात्याबद्दल सांगितलं. यावेळी त्यानं शाहरुखला शोमध्ये बोलवणं टाळलं आहे. शाहरुख सध्या 'डंकी'च्या प्रचारात बिझी आहे. त्यामुळे त्याला बोलवल्यास त्याला नकार देणं अडचणीचं ठरु शकलं असतं. पण आपण त्याला कधीही बोलवू शकतो, असा विश्वास करणला वाटतो. त्याला द्विधावस्थेत टाकणं करणला योग्य वाटलं नाही आणि म्हणूनच त्यानं शोमध्ये बोलवणं टाळलं असल्याचं तो म्हणाला.
करण जोहरनं शाहरुख खानसोबत अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्याला योग्य वेळ आल्यानंतर आमंत्रण देणार असल्याचंही यावेळी करण म्हणाला. आपण त्याला हक्कानं बोलवू शकतो. मी त्याचा सर्वात जवळचा मित्र आहे आणि तो माझ्या कुंटुंबाचा एक भाग आहे, असेही करण म्हणाला.
'कॉफी विथ करण'च्या या सीझनमध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सनी देओल, बॉबी देओल, सारा अली खान, अनन्या पांडे, आलिया भट्ट, करीना कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, राणी मुखर्जी आणि काजोल सारखे कलाकार पाहुणे दिसले आहेत. या शोमध्ये शाहरुख खानला पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी करण जोहरने संयम दाखवला आहे.