मुंबई- Kal Ho Naa Ho turns 20 : शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'कल हो ना हो' चित्रपटाच्या प्रदर्शनाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं निर्माता करण जोहरनं एक दीर्घ चिठ्ठी लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. करणने इन्स्टाग्रामवर एक विशेष कोलाज व्हिडिओ टाकला आहे. ज्यामध्ये चित्रपटातील 'हर घडी बदल रही है' या गाण्यावर काही दृश्यांची झलक पाहायला मिळते.
करण जोहरनं पोस्टला कॅप्शन दिले, "हा चित्रपट माझ्यासाठी आणि कदाचित आम्हा सर्वांसाठी अतिशय भावनिक प्रवास होता. काळजाची धडधड वाढवणाऱ्या कथेसाठी इतके तगडे कलाकार एकत्र आले होते. संपूर्ण कलाकार आणि कॅमेऱ्याच्या मागे काम करणाऱ्या टीमचं अभिनंदन."
'कल हो ना हो' हा करणचे वडील यश जोहर यांचा धर्मा कुटुंबांचा शेवटचा चित्रपट होता. याबद्दल करणनं लिहिलंय, "धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटासाठी माझा वडील कार्यरत होते, हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांची उपस्थिती मला आजही चित्रपट पाहताना जाणवते. या चित्रपटासाठी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं धन्यवाद, बाबा. मला तुमची नेहमीच आठवण येईल,"
इतका सुंदर चित्रपट तयार केल्याबद्दल करण जोहरनं दिग्दर्शक निखिल अडवाणीचेही आभार मानले आहेत. निखिल अडवाणी दिग्दर्शित, 'कल हो ना हो' चित्रपट अजूनही लोकांच्या स्मरणात आहे आणि आवडतो. या चित्रपटातील शाहरुखची भूमिका आणि त्याच्या तोंडी असलेले संवाद लोक अजूनही विसरु शकलेले नाहीत. या चित्रपटातील प्रीती झिंटा आणि शाहरुखच ऑन स्क्रिन केमेस्ट्रीही लोकांच्या कायम आठवणीत राहणारी आहे.