मुंबई- नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) चे उद्घाटन हे एक तारे तारकांची मांदियाळी जमा करणारे होते. जिओ वर्ल्ड गार्डन्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे शुक्रवारी रात्री सेलिब्रेटी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बी-टाउन सेलिब्रिटींपासून हॉलिवूड स्टार्सपर्यंत आणि संगीत आणि कला समुदायातील कित्येक दिग्गजांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शविली ज्यामध्ये प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनी मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससह मुंबई गाठली होती. प्रियंका चोप्राच्या अलिकडील एका मुलाखतीनंतर बॉलिवूडमधील राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे तिची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती.
कंगनाने करण जोहरवर केली होती टीका- अलिकडेच डॅक्स शेपर्डला दिलेल्या मुलाखतीत, प्रियांकाने सांगितले की ती कामाच्या शोधात भारत सोडून आली होती. इथल्या प्रस्थापित लोकांनी तिला कोपऱ्यात ढकलण्याचे काम सुरू केल्यामुळे म्यूझिकच्या माध्यमातून कामाच्या शोधात ती पश्मिमेकडील देशात आली होती. या मुलाखतीत प्रियांकाने कोणाचेही नाव घेऊन टीका केली नव्हती. मात्र कंगनाने करण जोहरचे नाव घेत त्यानेच प्रियंकाला छळल्याचे व कामावर बंदी घातल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली होती.