मुंबई- बॉलिवूडचा ख्यातनाम निर्माता दिग्दर्शक करण जोहरसाठी २०२३ हे वर्ष खूप छान गेले. त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सहा वर्षाच्या दीर्घ विश्रांती नंतर तो या चित्रपटातून दिग्दर्शनात परत आला आहे. अलिकडेच या चित्रपटाने ग्लोबल मार्केटमध्ये २५० कोटीची बॉक्स ऑफिस कमाई केली आहे. करण जोहरने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये २५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्याचा मेलबॉर्न फिल्म फेस्टीव्हलमध्ये शनिवारी सत्कार करण्यात आला.
सोहळ्यात मिळालेल्या सन्मानाबद्दल आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला मिळालेल्या यशाबद्दल करण जोहरने इंस्टाग्रामवर कृतज्ञता व्यक्त केली. त्याने लिहिले, 'गेल्या काही दिवसांपासून मला आजूबाजूच्या प्रेम आणि कृतज्ञतेची खूप मोठी भावना जाणवत आहे. काल रात्री जेव्हा मी मेलबॉर्नमध्ये जगाच्या प्रतिष्ठीत मंचावरुन पाहिले तेव्हा सिनेमाच्या जादूबद्दल मला कृतज्ञ वाटले. दिग्दर्शक म्हणून माझी 25 वर्षे साजरी केल्याबद्दल मेलबॉर्न फिल्म फेस्टीव्हलचे आभार. तुमचे प्रेम आणि माया माझ्या हृदयात कायमची राहील.'
अशा प्रकारे करणने आपल्या भावना व्यक्त करताच, चाहते आणि बॉलिवूड सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये गर्दी केली. या सत्कारासाठी करण हा सर्वात योग्य असल्याचे नामवंत फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने कमेंटमध्ये लिहिले. तुझा खूप अभिमान वाटत असल्याचेही काही चाहत्यांनी लिहिले.
गेल्या काही वर्षांत करण जोहरने स्वत:ला एक प्रतिष्ठित दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित केले आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीवर एक वेगळी छाप सोडली आहे. एक चित्रपट निर्माता म्हणूनही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्या धर्मा प्रॉडक्शन हाऊसने निर्माण केलेल्या काही चित्रपटांचा बोलबाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला आहे. या काळात नव्या दमाचे कलाकार शोधणे, त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडणे व वाव देणे आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यासाठी दरवाजे उघडणे यात करण जोहरने मोठे योगदान दिले आहे. त्याच्यावर नेपोटिझमचा सतत आरोप होत असला तरी त्याकडे दुर्लक्ष करत तो अत्यंत संयमाने हाती घेतलेले काम पार पाडत आला आहे.