बंगळुरू- Kannada Actor Nagabhushana Arrested : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून महत्त्वाची एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारनं बंगळूरूमध्ये फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला धडक दिल्यानं 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिचा 58 वर्षीय पती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी नागभूषणवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बंगळुरूमधील वसंतपुरा मेन रोडवर 30 सप्टेंबरला रात्री 9.45 च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमा एस (48) आणि कृष्णा बी (58) हे दोघे फूटपाथवर फिरत उत्तरहल्लीहून कोनानकुंटे क्रॉसच्या दिशेने कार चालवत असलेल्या अभिनेत्याच्या कारनं त्यांना धडक दिली. त्यानंतर नागभूषणची कार ही विजेच्या खांबाला धडकली.
साऊथ अभिनेता नागभूषणला झाली अटक : या गंभीर जखमी दाम्पत्याला नागभूषणनं खासगी रूग्णालयात दाखल केले. जखमी महिलेचा रुग्णालयात असताना मृत्यू झाला. तसेच तिच्या पतीवर आता सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र महिलेच्या पतीची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना या शहरातील कुमारस्वामी लेआउट ट्रॅफिक पोलीस हद्दीत घडल्यामुळं अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नागभूषणला अटक केली. यामुळे आता त्याच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तपासणीसाठी वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्कोमीटर चाचणीत त्यानं मद्य प्यायले नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नागभूषणच्या दाव्यानुसार रस्त्यात भटक्या वासराला कार धडकू नये, म्हणून त्यानं कट मारला होता.