मुंबई- यशराज फिल्म्सच्या निर्मात्यांनी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या आगामी चित्रपटातील 'कन्हैया ट्विटर पे आजा' हे पहिले गाणे रिलीज केले आहे. यात विकी कौशल भजन कुमारच्या भूमिकेत धमाल कराताना दिसत आहे.
यशराज फिल्म्सच्या आगामी कौटुंबिक ड्रामा चित्रपट 'द ग्रेट इंडियन फॅमिली' मधील पहिले गाणे बुधवारी रिलीज करण्यात आले. यात विकी कौशल स्थानिक संगीतकार भजन कुमारची भूमिका साकारताना दिसतोय. यात तो भगवान कृष्णाच्या भव्यतेची स्तुती करत भक्तांसमवेत ताला सुरात नाचताना आणि गाताना दिसतोय. धार्मिक लोकांमध्ये दिसणारी शेंडी त्याच्या डोक्यावर दिसत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी भजन कुमार या गाण्यातून प्रेमाचे आवाहन करताना वेगवेगळ्या डिजीटल माध्यामातील संज्ञा गाण्यात वापरताना दिसतो. संगीतकार प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे गायक नकाश अझीझने गायले आहे.
इन्स्टाग्रामवर हे गाणे शेअर करताना विकी कौशलने लिहिलंय, 'भजन कुमार आला आहे तुमच्या दारी. पाहा, 'कन्हैया ट्विटर पे आजा' यशराज फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलवर. द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.' या गाण्यातील त्याचा स्क्रिनवरील अवतार आणि त्याचा लूक प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे. मात्र हे धार्मिक स्वरुपाचे गाणे असल्यामुळे लोक त्याला संमिश्र प्रतिसाद देत आहेत.
नामवंत गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिली आहे आणि या गाण्याला नृत्यदिग्दर्शक विजय ए गांगुली यांनी कोरिओग्राफ केले आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपट २२ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.