मुंबई - बॉलिवूडची क्विन कंगना रणौत हिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीचे ट्विट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहे. इथे तिने स्क्रिप्ट रायटिंगचे प्रशिक्षण घेतले होते. तिच्या 'क्वीन' या चित्रपटाला 9 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री कंगनाने ट्विटरवर थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या चित्रपटाचे समिक्षकांनीही भरपूर कौतुक केले होते आणि या चित्रपटानंतर कंगनाची अभिनय कारकिर्द अधिकच भरभराटीस लागली होती.
2014 मध्ये पटकथालेखनाचा 8 आठवड्यांच्या कालावधीचा कोर्स तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीत हजेरी लावून पूर्ण केला होता. या सुंदर दिवसांची आठवण करून देऊन कंगनाने ट्विटची मालिका शेअर केली आहे. तिच्या ट्विटमध्ये अभिनेत्री कंगनाने असे म्हटले होते की दशकाच्या लढाईनंतर तिला क्विनच्या यशाने अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली.
तिने पुढे सांगितले की तिने त्या वेळी केवळ पैशासाठी या चित्रपटावर स्वाक्षरी केली आणि न्यूयॉर्कमधील फिल्म स्कूलमध्ये गेली. तेथे कंगना रणौत पटकथालेखन शिकली आणि कॅलिफोर्नियामध्ये एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली, जेव्हा ती फक्त 24 वर्षांची होती. आज, 9 वर्षांच्या कालावधीनंतर कंगना बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि सोशल मीडियाचीही क्विन बनली आहे.
कंगनाच्या या आवडत्या द न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीनेही आपल्या आवडत्या विद्यार्थीनीचे कौतुक केले आहे. फिल्म अकादमीने कंगनाचे ट्विट पुन्हा शेअर केले आणि लिहिले की 'क्वीन' पुढे काय करते हे पाहण्यासाठी अकादमी अधिक प्रतीक्षा करू शकत नाही. कंगानाच्या आगामी प्रकल्पांबद्दल बोलायचे तर अभिनेत्रीने तिच्या महत्वाकांक्षी प्रकल्प 'इमर्जन्सी' चे शूट पूर्ण केले आहे. हा तिचा दुसरे बायोपिक असेल ज्यात अभिनेत्री कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
कंगना रणौत हिने अलिकडेच तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. पूर्वाश्रमी चित्रपटात नायिका असलेल्या जयललिता यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंतचा खडतर प्रवास केला होता. यातील अनेक बारकावे यानिमित्ताने कंगनाने अवगत केले होते. चित्रपटात नायिका असताना जयललिता या सडपातळ शरीराच्या होत्या. वय वाढल्यानंतर त्यांच्यात मोठा बदल झाला व त्या जाड बनल्या होत्या. हे सर्व बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कंगनाने तलयवा या बायोपिकमध्ये दाखवले आहेत. यासाठी तिने भरपूर मेहनत घेतली होती.
हेही वाचा -Dream Girl 2 New Teaser : आयुष्मान खुरानाने रणबीरच्या 'तू झुठी मैं मक्कार' ट्विस्टसह 'ड्रीम गर्ल 2' चा नवीन टीझर केला शेअर