मुंबई- Tejas tanks at box office : कंगना रणौतच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवीय. 2019 पासून तिच्या एकाही चित्रपटाला यश आलेलं नाही. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'तेजस' या चित्रपटामुळे निर्मात्याचं 50 कोटीचं नुकसान झालंय. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आणि 14 दिवस थिएटरमध्ये लावल्यानंतरही जेमतेम 6 कोटींचा गल्ला जमा झाला.
अनेक वर्षांपासून कंगना रणौतचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केलेली नाही. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'तेजस' चित्रपट तिच्यासाठी आणखी एक अपयशी ठरलाय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगनानं खूप प्रयत्न केलं. पण चित्रपट पाहिल्यानंतर माऊथ पब्लिसिटी होऊ शकली नाही. एका रिपोर्टनुसार, चित्रपटाला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
रॉनी स्क्रूवाला निर्मित 'तेजस' चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर 14 दिवस चालल्यानंतर गुरुवारपर्यंत केवळ 6.06 कोटी रुपये कमावले. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अत्यल्प उत्पन्न आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून केवळ 70 लाख रुपये कमावल्यामुळे निर्मात्यांना 50 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलंय. चित्रपटाचे ओटीटी, सॅटेलाइट आणि संगीत हक्क 17 कोटी रुपयांना विकले गेलेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावरील वितरकांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून 2.23 कोटी रुपये कमावलेत.
निर्माते केवळ 19.23 कोटी रुपयाचा गल्ला वसूल करू शकलेत. त्यामुळे त्यांचे एकूण नुकसान 50.77 कोटी रुपये झालंय. कंगनाचा यापूर्वीचा 'धाकड' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. , धाकडच्या निर्मात्यांना 78.72 कोटी रुपयांचे नुकसान झालंय. दीपक मुकुट, सोहेल मकलाई आणि हुनर मुकुट यांनी अनुक्रमे 'धाकड'चे निर्माते आणि सहनिर्माते म्हणून काम केलं होतं. त्याच्या पूर्ण थिएटर रनमध्ये, 'धाकड' चित्रपटानं स्थानिक पातळीवर 2.58 कोटी रुपये गोळा केले होते.