मुंबई - Kangana perform Ravan Dahan : दिल्लीच्या ऐतिसाहसिक लाल किल्यामध्ये लव कुश रामलीला समितीच्या वतीनं रावण दहनाचा उत्सव पारंपिरक पद्धतीनं साजरा जातो. या उत्सवात पहिल्यांदाच रावणाचा पुतळा दहन करण्यासाठीचा रामबाण एक महिला सोडणार आहे. अभिनेत्री कंगना रणौतला पहिला ऐतिहासिक मान मिळणार आहे. तिनं आपल्या सोशल मीडिया पोस्टवरुन याचा खुलासा केला आहे तर दिल्लीतील लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंग यांनी या महत्त्वपूर्ण घडामोडीला अधिकृतपणे दुजोरा दिलाय.
कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तिनं आगामी कार्यक्रमाबद्दल चर्चा केलीय आणि तिच्या आगामी चित्रपट 'तेजस'बद्दल भाष्य केलंय. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, तिनं या कार्यक्रमाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर देत म्हटलंय की, 'या वर्षी लाल किल्ल्यावर लव कुश रामलीला समितीच्या ५० व्या वार्षिक उत्सवाचा हा एक महत्त्वपूर्ण क्षण आहे, कारण रावणाचा पुतळा जाळण्यात एक महिला पुढाकार घेतेय. जय. श्री राम.'
लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी खुलासा केला की, 'समितीच्या निर्णयावर संसदेनं सप्टेंबरमध्ये मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाचा प्रभाव होता. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या उत्सवात व्हिआयपी होते, त्यामध्ये काही कलाकार, राजकारणी आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच अजय देवगण आणि जॉन अब्राहम सारखे चित्रपट कलाकार सहभागी झाले आहेत. अभिनेता प्रभासनं गेल्या वर्षी रावणाचे दहन केलं होतं. आमच्या ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला रावणाच्या पुतळ्याला आग लावणार आहे.'