मुंबई - कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील स्वागतांजली हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. ऑस्कर विजेते संगीतकार एम एम किरवाणी यांनी संगीतबद्ध केलेले हे सुंदर गाणे चैतन्य प्रसाद यांनी लिहिले आहे व श्रीनिधी तिरुमला यांनी गायले आहे. या गाण्यात बॉलिवूड क्वीन कंगना साडीमध्ये भारी दागिन्यांसह दिसत आहे. नुकतेच रिलीज झालेले स्वागतांजली या गाण्यावर कंगना तिचे नृत्य कौशल्य दाखवताना दिसत आहे. लायका प्रॉडक्शनने आपल्या सोशल मीडियावरुन या गाण्याचे लॉन्चिंग केले.
इंस्टाग्रामवर लायका प्रॉडक्शनने गाणे शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले: 'सर्वांना स्वागतांजली !'चंद्रमुखी'च्या जगात प्रवेश करण्यासाठी सज्ज व्हा. चित्रपटाचे आम्ही पहिले सोलो गाणे रिलीज करत आहोत...'
'चंद्रमुखी २' हा चित्रपट पी वासू दिग्दर्शित आणि रजनीकांत आणि ज्योतिका यांच्या भूमिका असलेल्या अत्यंत यशस्वी तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा सिक्वेल आहे. हा पुन्हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असून पी. वासू याचे दिग्दर्शन करत आहेत. चंद्रमुखी २ हा कंगना स्टारर एक स्वतंत्र चित्रपट आहे. कंगना रणौत सौंदर्यवती असलेल्या कुशल नर्तिकेच्या भूमिकेत यात झळकणार आहे.
या चित्रपटात कंगना रणौत तमिळ अभिनेता राघव लॉरेन्ससोबत सहकलाकार करणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होईल. 'चंद्रमुखी २' या चित्रपटाशिवाय कंगना रणौतच्या हातात 'तेजस' हा चित्रपट आहे. यात ती वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा हवाई दलातील वैमानिक तेजस गिलच्या पराक्रमाभोवती फिरते. अगणित अडथळ्यांना तोंड देत आपल्या देशाची सेवा करणाऱ्या शूर सैनिकांमध्ये अभिमानाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न 'तेजस' या चित्रपटातून करण्यात आला आहे. सर्वेश मेवारा लिखित आणि दिग्दर्शित 'तेजस' हा चित्रपट २० ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याच बरोबर कंगना आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, विशाक नायर आणि श्रेयस तळपदे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.