मुंबई - Kangana Ranaut :प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतनं गुरुवारी अयोध्येत भगवान रामलल्लाची पूजा केली असून या मंदिराच्या पुजाऱ्यानं तिला पिवळ्या रंगाचा शेला आणि प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. यापूर्वी कंगनानं अयोध्येत भव्य राम मंदिर उभारताना देखील पाहिले आहे. जेव्हा ती अयोध्येत गेली होती, तेव्हा तिच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. राम मंदिराशी संबंधित प्रत्येक गोष्ट अगदी तिनं बारकाईने समजून घेतल्या आहेत. दरम्यान आता तिनं यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, 'हे आमचे भाग्य आहे की आम्ही हे मंदिर आमच्या डोळ्यांसमोर उभारताना पाहत आहोत. या मंदिरासाठी हिंदूंनी शतकानुशतके संघर्ष केला आहे. रामलल्लाचे मंदिर 600 वर्षांनंतर बांधले गेले आहे. आमच्या पिढीला हा भाग्याचा दिवस पाहायला मिळत आहे'. त्यानंतर तिनं पुढं सांगितलं की, 'हे मंदिर पाहण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्राणही गमाविले आहे'. याशिवाय कंगना रणौतनं अयोध्येवर एक स्क्रिप्टही लिहिली आहे असं तिनं सांगितलं. तसेच तिनं पुढं म्हटल, 'आज हे सर्व मोदी सरकारमुळेच झालं आहे, आमच्या योगीजींनीही याबाब खूप संघर्ष केला आहे'.
कंगना राणौत अयोध्येत :नवी दिल्लीतील लाल किल्ल्यातील रामलीलेत रावण दहन करून इतिहास रचल्यानंतर कंगना नुकतीच अयोध्येला पोहोचली. त्याआधी ती इस्त्रायलच्या राजदूताला भेटली होती. कंगनाचा 'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी ती श्रीरामाचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला गेली आहे. सध्या काही कंगनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.