मुंबई - Kangana Ranaut reacts to BJP MP : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी आपल्या बिनधास्त आणि काही वेळा बेताल वक्तव्यामुळे चर्चेत राहत असते. तिने अलीकडेच कॅनडास्थित पंजाबी गायक शुभनीत सिंगला त्याच्या वादग्रस्त पोस्टबद्दल कठोर प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच शक्तिहीन नेत्यांची तुलना मंदिरांमधील हिंदू देवतांच्या मूर्तींशी केल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरही कंगनाने टीका केली. या सगळ्यात भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कंगनाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संसदेमध्ये झालेल्या चर्चेच्यावेळी भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर असंसदीय भाषेत टीका केली होती. यावेळी त्यांनी वापरलेली भाषा सर्वांनाच खटकली. यावरुन त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाने जोरदार आवाज उठवला होता. हाच संदर्भ घेऊन अभिनेत्री कंगना रणौतने आपलं मत मांडलं आहे.
शनिवारी सोशल मीडियावर कंगनानं एक पोस्ट पुन्हा शेअर केली आणि तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, कोणीही आपली मर्यादा ओलांडू नये. एकदा ही रेषा एका बाजूनं ओलांडली गेली त्या क्रियेचा डोमिनो इफेक्ट होतो जो लवकर थांबत नाही. मग आम्ही किती पुढे जाऊ शकतो? माझी सर्वांना विनंती आहे की, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या वचनानुसार चालत राहा. प्रतिष्ठा राखा. जय श्री राम.'
कंगनाच्या चित्रपट प्रोजेक्टबद्दल बोलायचं झाल्यास, कंगना रणौत आगामी पी. वासूच्या 'चंद्रमुखी 2' मध्ये झळकणार आहे, ज्यामध्ये राघव लॉरेन्स याचीही भूमिका आहे. हा हॉरर ड्रामा चित्रपट रजनीकांत आणि ज्योतिका यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'चंद्रमुखी' या हिट तमिळ चित्रपटाचा सीक्वल आहे. त्यासोबतच कंगना सर्वेश मेवारा दिग्दर्शित 'तेजस' या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या हातात तिनं स्वत: दिग्दर्शित केलेला 'इमर्जन्सी' हा चित्रपटही आहे. या चित्रपटात अनुपम खेर, सतीश कौशिक आणि मिलिंद सोमण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत आणि 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.