मुंबई : बॉलिवूडमधील 'बबली गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजोलला याघडीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. काजोल५ ऑगस्ट २०२३ रोजी तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आतापर्यंत जवळपास ५० चित्रपट आणि काही ओटीटी प्रोजेक्टसध्ये काम केले आहे. काजोल एक लाऊड आणि बोल्ड व्यक्तिमत्त्व आहे, ती नेहमी मोकळेपणाने बोलण्यावर आणि हसण्यावर विश्वास ठेवते. चाहत्यांना तिची शैली खूप आवडते, परंतु कधीकधी सहकलाकार आणि दिग्दर्शकांसाठी ती समस्या बनते. काजोलच्या बर्थडे स्पेशलमध्ये आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहोत.
काजोलची कारकिर्द :काजोलला लहानपणापासूनच अभिनयाची केझ होती. काजोलची आजी शोभना समर्थ, मावशी नूतन आणि आई तनुजा या त्यांच्या काळातील दिग्गज अभिनेत्री होत्या. काजोलच्या कुटुंबात अभिनयाचा वारसा असल्याने तिला रुपेरी पडद्यावर काम करण्याची इच्छा आधीपासूनच होती. काजोलचे वडील शोमू मुखर्जी देखील दिग्गज चित्रपट निर्माते होते. याच कारणामुळे काजोलने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी 'बेखुदी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर काजोलने तिच्या बबली अंदाजाने प्रेक्षकांचे मने जिंकली. काजोलचा हा अंदाज हा प्रेक्षकांनाच नाही तर चित्रपट दिग्दर्शिकांना देखील आवडायला लागला होता.
अमिताभ बच्चन यांनी खडसावले : काही काळापूर्वी काजोलने 'कौन बनेगा करोडपती'च्या १४व्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये भाग घेतला होता. त्यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील एक किस्सा शेअर केला. अमिताभ यांनी सांगितले होते की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एका सीनमध्ये व्यस्त होते आणि त्यादरम्यान काजोल जोरात हसत होती. यावर 'बिग बी' संतापले. त्यानंतर 'बिग बी'ने कठोरपणे म्हटले होते की, 'कलाकारासाठी हे किती विचलित करणारे आहे याची तुम्हाला कल्पना आहे?' हे ऐकून काजोल लाजून अक्षरशः तोंड लपवले होते. अनेकदा काजोल तिच्या बोलघेवड्या स्वभावामुळे मीडिया समोर काहीही बोलून मोकळी होते.
काजोलला शाहरुख खाननेही फटकारले : काजोलच्या सतत हसण्याने एके काळी शाहरुख खानही नाराज झाला होता. स्वतः काजोलने एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा 'करण अर्जुन' चित्रपटातील 'जाती हूँ मैं' गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा होता. काजोलने सांगितले, 'शूटिंगदरम्यान आम्ही खूप हसलो होतो. शाहरुख ही अशी व्यक्ती आहे जी सेटवर स्वतःचे संवाद पाठ करतोच, पण सोबतच्या कलाकाराचेही संवाद तोंडपाठ करुन घेतो. कारण प्रत्येकाने चांगले काम करावे, अशी त्याची इच्छा असते. त्यादिवशी फक्त तोच मला काम करण्याची हिंमत देऊ शकला. गाण्यातील नृत्य सोपे होते, पण गाण्यात असा काही भाग होता ज्यामध्ये मी घोड्यासारखी दिसत होते. मला हसणे कठीण होते. मी थोडी हसत होते. पुढे तिने सांगितले की, शाहरुखला याचा खूप राग येत होता. तो पुन्हा पुन्हा म्हणायचा जरा गप्प बस. फक्त काम कर. मात्र मी हसणे थांबवू शकले नाही. त्यानंतर शाहरुख अस्वस्थ झाला आणि त्याला अभिनय करता आला नाही.