मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. 7 सप्टेंबर रोजी रिलीज झाल्यानंतर जवाननं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कब्जा केला. भारतासह जगातील मार्केटमध्ये जवानचाच बोलबाला सुरू होता. गदर २ चित्रपटाच्या कमाईची घसरण सुरू झाल्यानंतर अॅटली कुमार दिग्दर्शित जवान चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने केवळ 13 दिवसात 500 कोटी रुपयांच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आणि बॉक्स ऑफिसवर विक्रम केला. असे असले तरी 14 व्या दिवसानंतर मात्र चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर थोडीशी घसरण होण्याची शक्यता आहे.
जवान चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 14 व्या दिवशी 15.3% ने कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवान भारतात 14 व्या दिवशी 12 कोटी रुपयांची कमाई करेल असा होता. त्यानुसार चित्रपटाची एकूण कमाई अंदाजे एकूण 520.06 कोटी रुपये झालीय. दरम्यान, जागतिक स्तरावर जवान चित्रपटाने 12 दिवसांच्या थिएटर रननंतर 883.68 कोटी रुपयांची कमाई केल्याचं जवानच्या निर्मात्यांनी मगळवारी जाहीर केलंय.
किंग खान शाहरुख यांच्या शिवाय जवान चित्रपटात तामिळ सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या जबरदस्त भूमिका आहेत. छोट्या कॅमिओ रोलमध्ये दीपिका पदुकोणही लक्ष वेधून गेली आहे.
पठाण चित्रपटानंतर जवानला मिळालेल्या घवघवीत यशामुळे शाहरुख खाननं पुन्हा एकदा तो बॉलिवूडचा किंग खान असल्याचं सिद्ध केलंय. या वर्षाच्या अखेरीस त्याचा राजकुमार हिरानी दिगदर्शित डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे.