मुंबई - Box office collection of jawan day 10 : शाहरुख खान स्टारर 'जवान' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून धुमाकूळ घालत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं देशातच नाही तर परदेशातही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन नऊ दिवस झाले असून या चित्रपटानं जागतिक बॉक्स ऑफिसवर 700 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. 'जवान'ला या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळं या चित्रपटानं 9 दिवसात देशांतर्गत 400 कोटींचा टप्पा पार करून नवा विक्रम रचला आहे.
'जवान' चित्रपटाची एकूण कमाई :'जवान' चित्रपटानं या बाबतीत पठाण आणि गदर 2 ला खूप मागे टाकले आहेत. या चित्रपटानं अत्यंत जलद गतीनं 400 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. इतक्या लवकर यापूर्वी कुठल्याचं हिंदी चित्रपटानं कमाई केली नव्हती.'जवान' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 75 कोटीची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी , पाचव्या दिवशी 32.92 कोटी, सहाव्या दिवशी 26 कोटी, सातव्या दिवशी 23.2 कोटी, आठव्या दिवशी 21.6 कोटी आणि नव्या दिवशी 21 कोटी कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं आतापर्यत एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 410.88 झालं आहे. हा चित्रपट रिलीजच्या 10व्या दिवसात आहे. 'जवान' दहाव्या दिवशी 32 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 442.49 होईल.
लवकरच करणार 500 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री : 'जवान'ची दुसऱ्या आठवड्यात कमाई भारतात 500 कोटींच्या पुढे जाऊ शकते, तर जगभरात हा चित्रपट 800 कोटी रुपयांचा आकडा पार करू शकतो. जवान हा अॅटली दिग्दर्शित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, प्रियामणी, एजाज खान, सुनील ग्रोव्हर यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांनीही चित्रपटात खास कॅमिओ केला आहे. जवान 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.