मुंबई :'पठाण' नंतर शाहरुख खान 'जवान'सोबत बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे. अॅटली दिग्दर्शित 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'जवान' चित्रपट रिलीज होण्यासाठी अजून 12 दिवस बाकी आहेत. मात्र सध्या चाहते 'जवान' चित्रपटाच्या आगाऊ तिकीट बुकिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. 'जवान'चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. मुंबईतील काही निवडक ठिकाणी तिकीट बुकिंग सुरू झाले असून, अनेक चित्रपटगृहे काही मिनिटांतच हाऊसफुल्ल झाली आहेत.
अॅडव्हान्स बुकिंग सुरू : 'जवान' हा शाहरुख खानचा पॅन इंडिया चित्रपट आहे, जो हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरानंतर आता निर्मात्यांनी भारतातही बुकिंग सुरू केली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही 'जवान'ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. हा चित्रपट 2Dमध्ये प्रदर्शित होणारा आहे. 'जवान' चित्रपट पाहण्यासाठी दिल्लीतील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. चित्रपटाच्या तिकिटांची किंमत 300-500 पर्यंत आहे. 'जवान' हा चित्रपट पाहण्यासाठी लोक 1000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत तिकीट खरेदी करण्यास तयार आहेत.
१५ मिनिटांत सिनेपोलिस हाऊसफुल्ल शो :अॅडव्हान्स बुकिंगशी संबंधित ट्विट शेअर करत एका चाहत्याने लिहिले, 'अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर १५ मिनिटांत सिनेपोलिसचे शो हाऊसफुल्ल झाले.' या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहे. याशिवाय 'जवान'चे बुकिंग भारतात मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि मुरादाबादमध्येही बुकिंगचा वेग पाहायला मिळाला आहे. काही ठिकाणी 'जवान'ची तिकिटे 1100 रुपयांपर्यंत विकली जात असल्याचेही समोर आले आहे. शाहरुख खान 'जवान' चित्रपटात दुहेरी भूमिकेत मनोरंजन करताना दिसणार आहे. अॅटली कुमारसोबतचा शाहरुखचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री नयनतारा देखील दिसणार आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.