मुंबई - Javed Akhatar about Ramayan : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला माझ्यासारखी नास्तिक व्यक्ती कशी? असा प्रश्न अनेकांना पडला असंल तर राम आणि सीता हे फक्त हिंदू धर्मियांचे नाहीत, तर ते या देशाच्या संस्कृतीचं प्रतीक आहेत. रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता आहे, असं रोखठोक मत प्रसिद्ध गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी मांडलाय.
स्वतःला नास्तिक समजणारे जावेद अख्तर - 'मनसे'तर्फे दरवर्षी शिवाजी पार्क येथे दिवाळी निमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं हे ११ वे वर्ष असून या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रसिद्ध गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर व सलीम खान यांना आमंत्रित केलं होतं. पाकिस्तानात जाऊन आपल्या भूमीचा मान राखणारे व पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांची प्रशंसा राज ठाकरे यांनी दिलखुलासपणे एका जाहीर सभेत केली होती. दीपोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित असलेल्या जावेद अख्तर यांनी याप्रसंगी बोलताना म्हटले की, "या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. सलीम - जावेद शिवाय राज ठाकरे यांना दुसरे कोणी भेटलं नाही का? असा प्रश्नही अनेकांना पडला असंल. तसंच स्वतःला नास्तिक समजणारे जावेद अख्तर या मंचावर कसे काय? असंही अनेक जणांना वाटलं असंल. पण राज ठाकरे हे आमचे परममित्र असून त्यांनी शत्रूला सुद्धा आमंत्रण दिले तर तो नकार देणार नाही. अशामध्ये आम्ही तर मित्र आहोत", असं जावेद अख्तर यांनी सांगितलं. याप्रसंगी फिल्म अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सलीम जावेद यांची मुलाखत घेतली व या मुलाखतीला सुद्धा सलीम - जावेद यांनी भन्नाट उत्तरं दिली.
रामायण ही देशातील प्रत्येक व्यक्तीची संपत्ती - 'शोले' चित्रपटातील शंकराच्या मंदिरातील एका सीन बद्दल बोलताना देखील जावेद अख्तर यांनी सांगितलं की, 'शोले'मधील तो सीन मी किंवा सलीमजी आताच्या प्रसंगी लिहू शकत नाही. कारण सध्या मंदिराबाबत आपण सर्व इतके भावनिक झालो आहोत की कोणत्याही गोष्टीमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे 'संजोग' चित्रपटातील कृष्ण सुदामाचं संपूर्ण आयुष्य ओम प्रकाश यांनी तेव्हा चित्रपटातील गाण्यांमधून दाखवलं होतं. पण ते आता आपण करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचही मनापासून कौतुक केलंय. हिंदूंचं मन हे विशाल असल्याकारणानं ही संस्कृती सुद्धा तितकीच समृद्ध आहे, असे ते म्हणाले. तसंच, माझा जन्म श्री राम आणि सीता यांच्या देशात झाला असून मी राम आणि सीता यांना फक्त हिंदूंचा वारसा समजत नाही तर या देशातील प्रत्येक व्यक्तीची ती संपत्ती आहे. राम व सीता हे या देशातील एकूण एक नागरिकांचे दैवत आहेत. तसेच रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता असल्याचंही जावेद अख्तर यांनी सांगितलंय.
त्या लेखकांचं काम नेहमी उत्तम होतं - याप्रसंगी बोलताना सलीम खान यांनी आजच्या लेखनाबद्दल परखड मतं व्यक्त केलंय. ते म्हणाले की, आजकाल लोकांना पटकन प्रसिद्धी हवी आहे. त्यासाठी वाईट किंवा द्विअर्थी असं लेखन केलं जातं. परंतु शाश्वत लेखन मूल्याची जपवणूक करण्याचं भान लेखकानं कधीही सोडता कामा नये. तसंच जे चांगलं आहे त्याला चांगल म्हणणे व जे वाईट आहे त्याला वाईट म्हणणे याबाबत ज्यांचे एकमत असतं, त्यांचं काम नेहमी उत्तम होतं, असेही सलीम खान म्हणाले आहेत.