मुंबई - Kiran Mane about Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तब्येत खालावली असतानाही जरांगे पाटील या आंदोलनावर ठाम आहेत. राज्यभरात आरक्षणावरून मराठा आंदोलक आक्रमक होत असताना समाजाच्या सर्वच थरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात. राजकीय विषय जेव्हा येतो तेव्हा मराठी कलाकार मात्र स्पष्ट भूमिका घेताना सहसा दिसत नाहीत. याला अपवाद नेहमीच ठरत आलाय अभिनेता किरण माने. किरणने एक फेसबुकवर पोस्ट लिहून मनोज जरांगेंच्या लढाऊपणाला सलाम केलाय.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहजशक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पहाणार्या व्यवस्थेला तो धाक 'दाखवण्याचं' महान कार्य तुम्ही करताहात ! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे.'
किरण मानेंनी लिहिलेल्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. सिने सृष्टीमधील पहीलीच पोस्ट , धन्यवाद किरणजी माने ! समाज तुमच्यापण पाठीशी असेलच, बाकी सिनेसृष्टी झोपली वाटतं असो!, असं प्रशांत शिंगटे यांनी म्हटलंय. 'तर, किरणजी या विषयावर तुम्ही सातत्याने लिखाणातून वाचा फोडावी ही प्रांजळ अपेक्षा..', असंही एकानं लिहिलंय. अनिल कुंजीर यांनी लिहिलंय, 'मनोज जरांगे पाटील सारख्या गावखेड्यातील सर्व साधारण कुटुंबातील व्यक्तीने उपोषणाद्वारे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणत... सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकांना अक्षरशः घाम फोडला आहे.. हे सर्वांनाच मान्य करावेच लागेल..संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढवय्या, जिद्दी,त्यागी वृत्तीला सलाम...'