मुंबई- दक्षिण भारतीय चित्रपट आणि रजनीकांतचे किस्से 'ऐकावे तितके नवलच' आहेत. १० ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय तामिळनाडूतील अनेक कंपन्यांनी घेतला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की असं काय आहे की ज्या दिवशी आपले काम थांबवून कंपन्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देत आहेत. तर याची कारणही अजब आहे. अहो, या दिवशी रजनीकांतचा 'जेलर' सिनेमा रिलीज होणार आहे!! त्यामुळे काम सुरू ठेवले तर तसेही कर्मचारी काही कामावर येणार नाहीत, त्यापेक्षा 'झाकली मूठ सव्वा लाखाची' ठेवण्याचा निर्णय इथल्या कंपन्यांनी घेतला असावा.
तामिळनाडूतील खासगी कंपन्यांनी १० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्याच्या निर्णयामागे आणखी एक सबळ कारण आहे. अपवाद वगळता दरवर्षी एकतरी रजनीकांतचा चित्रपट प्रदर्शित होतो आणि त्याला अगदी सण समजून करोडो चाहते पाहायला जातात. तो सिनेमा पाहण्यासाठी त्यांना समीक्षकांच्या सल्ल्याची गरज लागत नाही. फक्त थलैयव्वाने सिनेमा रिलीजची तारीख जाहीर केली की अॅडव्हान्स बुकिंगच्या रांगेत ही चाहते मंडळी अगदी भक्तीभावाने उभे राहिलेले असतात. पहिल्या दिवशीची पहिला शो मिळाला नाही तर दुसरा, तिसरा अगदी कितवाही शो त्यांना अटेंड करायचा असतो. अर्थात रजनीकांतच्या शोसाठी राज्यातील सर्व शहरातील थिएटर्स आधीपासूनच तयारी करतात. त्यामुळे अगदी पहाटेच्या शोपासून लोकांचा दिवस सुरू होतो. रजनीकांतचा सिनेमा रिलीजचा दिवस हा एक लोकोत्सव असतो आणि हा लोकोत्सव गेली दोन वर्षे घडलेला नाही. 'अन्नाथे' हा रजनीचा सिनेमा २०२१मध्ये रिलीज झाला त्याला आता तब्बल दोन वर्षे उलटली आहेत. त्यामुळे दोन वर्षे तुंबलेला हा लोकोत्सव दिमाखात साजरा करण्याचा निर्धार चाहत्यांनी केला असल्याने बिच्चारे कंपनीवाले तर काय करणार, त्यामुळे सुट्टी देऊन कंपनीवाले स्वतःही या लोकोत्सवात सामील झाले आहेत.
आता तुम्हाला वाटले असे की कंपनीच्या एचआरने सुट्टी जाहीर करुन टाकली आणि विषय संपवला, तर तसे नाही. काही कंपन्यांच्या एचआरने चक्क तिकीटे खरेदी करण्याच्या रांगेत आपले लोक उभे केले आणि अॅडव्हान्स बुकिंग केलेली तिकीट कर्मचाऱ्यांना देऊन त्याचे पुण्य आपल्या कंपनीच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. रजनीकांतचे किस्से जेव्हा आपण ऐकतो तेव्हा काही गोष्टी अकल्पित वाटायला लागतात, पण थलैव्वाच्या राज्यात 'रजनी है तो सब मुमकीन है' अशीच काळ्या दगडावरची रेघ आहे.
'जेलर' या आगामी रजनीकांत स्टारर चित्रपटात प्रियांका मोहन, शिवा राजकुमार, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी आणि विनायकन यांच्याही भूमिका आहेत. दिग्गज मल्याळम अभिनेता मोहनलाल यात कॅमिओ भूमिका साकारत आहेत.