मुंबई - मेगास्टार रजनीकांतचा अलिकडेच रिलीज झालेल्या 'जेलर' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. गेली १९ दिवस 'जेलर'ची जादु बॉक्स ऑफिसवर सुरू आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' चित्रपट यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. अॅक्शन कॉमेडी असलेल्या या चित्रपटाने भारतात ३१८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मतानुसार रजनीकांतच्या जेलर चित्रपटाने सोमवारी भारतात सर्व भाषांमध्ये अंदाजे २.५० कोटी रुपयांची कमाई केली. २०१८मध्ये रिलीज झालेल्या २.० चित्रपटानंतर हा पराक्रम करणारा जेलर हा दुसरा चित्रपट ठरला आहे. ट्रेड विश्लेषक मनोबाला विजयबालन यांच्या म्हणण्यानुसार जेलरने रविवारी जगभरात एकूण ६०७.२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तमन्ना भाटिया, वसंत रवी, योगी बाबू, रम्या कृष्णन आणि विनायकन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'जेलर' चित्रपटातून कन्नड सुपरस्टार आणि दिवंगत सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा शिवा राजकुमारचा तामिळ पदार्पण झाला आहे. या शिवाय जॅकी श्रॉफ आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेतून रंगत वाढवली आहे.
मेगास्टार रजनीकांत २०२१ मध्ये 'अन्नात्थे' चित्रपटात अखेरचे दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासह नयनतारा, खुशबू आणि कीर्ती सुरेश देखील होते. जेलरला मिळालेल्या यशानंतर रजनीकांत चेन्नईत सक्सेस पार्टी करताना दिसला होता. या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.