मुंबई : सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट हा बॉक्स ऑफिस चांगलीच कमाई करत आहे. 'जेलर' चित्रपट १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट दररोज अनेक रेकॉर्ड मोडत आहे. सहा दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली असून जगभरात हा चित्रपट ४०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होईल असे दिसत आहे. हा चित्रपट लवकरच ५०० कोटीचा आकडा जगभरात पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 'जेलर' हा एक अॅक्शन मनोरंजन चित्रपट आहे ज्यामध्ये रजनीकांतसोबत शिव राजकुमार, मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत. या चित्रपटाच्या जबरदस्त कामगिरीमुळे रजनीकांतची जादू अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.
'जेलर' चित्रपटाचे कलेक्शन :'जेलर' चित्रपटाने मणिरत्नमच्या 'पोन्नियन सेल्वन पार्ट १'च्या कलेक्शनचा विक्रम सहा दिवसांत मोडला आहे. १५ ऑगस्ट रोजी, 'जेलर' चित्रपटाने एक उत्तम कलेक्शन केले आहे. सार्वजनिक सुट्टीचा चित्रपटाला खूप फायदा झाला. रिपोर्ट्सनुसार, 'जेलर'ने सहाव्या दिवशी सुमारे ३३ कोटीची कमाई केली आहे. यानंतर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २०७.१५ कोटींवर पोहोचले आहे. तामिळनाडूशिवाय केरळमध्येही 'जेलर' चित्रपटाची कामगिरी चांगली आहे. 'जेलर'ने पहिल्याच दिवशी देशांतर्गत ४८ कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २५.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३४ कोटीची कमाई केली होती. या चित्रपटाने तीन दिवसात १०० कोटीचा टप्पा ओलांडला होता. 'जेलर'ने तीन दिवसात एकूण १०८ कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता.