मुंबई :सुपरस्टार रजनीकांतचा नुकताच प्रदर्शित झालेला 'जेलर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. रजनीकांतच्या या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत होते. दरम्यान रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट सनी देओलच्या 'गदर २' च्या एक दिवस आधी रिलीज झाला होता. या चित्रपटाने चौथ्या दिवशी जगभरात ३०० कोटींचा आकडा पार केल्याचे सांगितले जात आहे. रजनीकांत ज्याला त्यांचे चाहते हिरो नाही देव मानतात. त्याच्या चाहत्यांसाठी 'जेलर' चित्रपट एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'जेलर' चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित हा चित्रपट १५० कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी सज्ज आहे. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट खूप कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.
'जेलर' चित्रपटाची कमाई : रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट १० ऑगस्ट रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १४६.४० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 'जेलर' चित्रपटाने १० ऑगस्ट रोजी ५० कोटींहून अधिक कमाई करून भव्य ओपनिंग केली होती. यानंतर शुक्रवारी २५.७५ कोटी रुपये आणि शनिवारी सुमारे ३३.७५ कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'जेलर' चित्रपटाने पहिल्या रविवारी सुमारे ३८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चार दिवसांचे कलेक्शन १४६ कोटींवर पोहोचले आहे. पहिल्या रविवारी, 'जेलर' चित्रपटाची एकूण व्याप्ती ८९.२४ टक्के होती.