मुंबई :रजनीकांतच्या 'जेलर'ची क्रेझ प्रेक्षकांच्या डोक्यावर चढली आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. 'जेलर'ने मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन पार्ट १'च्या एकूण कमाईचा विक्रमही सहज मोडला आहे. यासह, रजनीकांतचा हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट बनला आहे. याशिवाय 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडून एक इतिहास रचला आहे. 'जेलर'ला रिलीज होऊन दोन आठवडे उलटूनही हा चित्रपट चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर करत आहे.
रिलीजच्या १३व्या दिवशी 'जेलर'ची कमाई : सनी देओलच्या 'गदर २'च्या वादळात 'जेलर'हा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाद्वारे रजनीकांतने दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर शानदार पुनरागमन केले आहे. 'जेलर' देशातच नाही विदेशातही चांगला लोकप्रिय ठरत आहे. अलीकडेच या चित्रपटाने जागतिक स्तरावर ५०० कोटींचा आकडा पार करून मोठी कामगिरी केली होती. दरम्यान 'जेलर'च्या रिलीजच्या १३व्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. 'जेलर'ने रिलीजच्या १३व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी ४.०७ कोटींची कमाई केली आहे. यासह, 'जेलर'ची १३ दिवसांची एकूण कमाई देशांतर्गत आता २९२ कोटी रुपयांवर पोहचली आहे.