मुंबई :सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं थिएटरमध्ये थैमान घातलं आहे. 'जेलर'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट अजूनही जोरदार कमाई करत आहे. दरम्यान आता सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ११ दिवसांनंतर या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट दिसून येत आहे. ११व्या दिवशी या चित्रपटानं सर्व भाषांमध्ये सुमारे १८ कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह 'जेलर'चं एकूण कलेक्शन २६३.९ कोटी झालं आहे. 'जेलर'नं चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दहा दिवसांत प्रभावी कलेक्शन केलं आहे. या चित्रपटानं यूएस मार्केटमध्ये ५ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त कमाई केली. 'जेलर'चं प्रॉडक्शन बॅनर सन पिक्चर्सनं एक ट्विट शेअर केलं आहे, यामध्ये या चित्रपटानं किती व्यवसाय केला याबद्दल सांगितलं गेलं आहे.
रजनीकांतने दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर केले पुनरागमन :'जेलर' चित्रपट १० ऑगस्ट रोजी रिलीज झाला. या चित्रपटाद्वारे 'थलैवा' दोन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतला आहे. रजनीकांत दोन वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर पुनरागमन करताना पाहून चाहते उत्साहित झाले आहेत. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. 'जेलर' या चित्रपटाला जगभरात पसंती मिळत आहे. तामिळ भाषेतील 'जेलर' हा तिसरा चित्रपट आहे, ज्याने इतकी कमाई केली आहे. यापूर्वी 'रोबोट २' 'पोनियिन सेल्वन भाग १ हे चित्रपट ५०० कोटीच्या क्लबमध्ये दाखल झाले होते.