मुंबई- रजनीकांतच्या आगामी 'जेलर' चित्रपटाची प्रतीक्षा चित्रपट शौकिन अत्यंत आतुरतेने करत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल, अशी जोरदार चर्चा आहे. कारण जेलरने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १९.४४ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
'जेलर' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळालेला हा उदंड प्रतिसाद प्रेक्षकांमध्ये असलेली चित्रपटाबद्दलचे प्रेम दर्शवते. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, भारतात जेलर चित्रपटाने प्री-बुकिंगद्वारे १२.८ कोटी रुपये कमावले आहेत, ज्यात ११.७ कोटी रुपये तामिळ आवृत्तीचे आणि १.१ कोटी रुपये तेलुगू मार्केटमधून आहेत. अमेरिकेतही 'जेलर'ने चित्रपट पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ठिकाणी तब्बल ३७ हजार तिकिटे विकली गेली आहेत आणि गल्ल्यामध्ये ६.६४ कोटी जमा झाले आहेत. अॅडव्हान्स बुकिंगचा अमेरिकेतील तिकीट विक्रीचा आकडा १ कोटी पार करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाची जबरदस्त क्रेझ असल्यामुळे याच्या वितरणाचे हक्क १२३ कोटींना विकले गेले आहेत. यातील सर्वाधिक ६० कोटीचा हिस्सा एकट्या तमिळनाडू राज्यातला आहे. कर्नाटकमधून १० कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून १२ कोटी आणि केरळ राज्यातून साडेपाच कोटीची तर उर्वरित भारतातून ४ कोटींची भर पडली आहे.
नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी दक्षिणेतील तामिळनाडूसह इतर राज्यातील शहरामध्ये अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. काही कंपन्यांनी तर तिकीटे खरेदी करुन त्याचे वाटप आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये केले आहे.