मुंबई Jackie Shroff felt proud : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्या भूमिका असलेल्या 'गणपथ : अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटाचा आकर्षक टीझर लॉन्च झाला. टीझरमधील मुलाचं काम पाहिल्या नंतर टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांचं ह्रदय भरुन आलं. त्यानं मुलाचं कौतुक आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना अजिबात हात अखडता घेतला नाही. जॅकीनं गणपथचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिलं, 'मेहनत, सबकी इज्जत और काम पे ध्यान... तुला खूप पुढं घेऊन जाईल. तू जसा आहेस तसाच कायम राहा. मुलांना प्रेरणा देत राहा. माझा अभिमान, मेरा बच्चा है तू. गणपथसाठी खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. 'गणपथ' चित्रपट या दसऱ्याला 20 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.'
गणपथ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपटाचा अधिकृत टीझर लाँच केला. इंस्टाग्रामवर टायगरने टीझरचे लॉन्चिंग केलं आणि त्यामध्ये लिहिलं, 'इंतजार का वक्त खतम हुआ… आ गये हैं हम आपके अपनी दुनिया में ले जाने. गणपथ चित्रपट या दसऱ्याला, 20 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.'
विकास बहल दिग्दर्शित 'गणपथ' या चित्रपटात टायगर श्रॉफ, कृती सेनॉन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2020 सालाच्या पार्श्वभूमीवर सेट करण्यात आलेल्या या चित्रपटात गुलामाप्रमाणे वागवण्यात येणाऱ्या लोकांसाठी टायगर श्रॉफ आशेचा किरण म्हणून येतो. या टीझरमध्ये टायगर श्रॉफ हार्डकोर अॅक्शन सीन करताना आणि बॉक्सिंग रिंगमध्ये लढताना दिसत आहे. टीझरमध्ये क्रिती सेनॉन गुंडांशी दोन हात करताना दिसत आहे आणि अमिताभ बच्चन यामध्ये संपूर्ण पांढर्या पोशाखात दिसत आहेत.
'गणपथ' चित्रपटाविषयी बोलताना निर्माता जॅकी भगनानी म्हणाले, आम्ही आमच्या सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक 'गणपथ: अ हिरो इज बॉर्न' प्रदर्शित करताना रोमांचित आहोत.' हा चित्रपट प्रचंड उत्कटतेने आणि एका अनोख्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. एका अनोख्या कथेसह प्रेक्षकांना आश्चर्यकारक अनुभव देणारा हा चित्रपट आहे.' 'गणपथ'चा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना आवडल्याचं दिसत आहे. लोक त्यावर भरपूर प्रतिक्रिया देत असून फायर इमोटिकॉन्ससह कमेंट सेक्शन भरुन गेलं आहे.