मुंबई - Jaane Jaan promotion : अभिनेत्री करीना कपूरने दिग्गज डिझायनर सब्यसाचीच्या फुलांच्या साडीतील सुंदर फोटो शेअर करुन चाहत्यांना खूश केलंय. फोटोत करीना पिवळ्या लिंबू साडीमध्ये गुलाबी फ्लॉवर प्रिंटसह कॅमेऱ्याला पोज देताना दिसतेय. या साडीसह तिने बॅकलेस ब्लाऊजही परिधान केला होता. करीनाने आपले ग्लॅमर दाखवताना हलका मेकअप केल्याचे दिसते. भांगाच्या एका बाजूला वेणी आणि कानातले सुंदर डूल यामुळे तिचा लूक आणखी शोभिवंत बनलाय.
करीनाच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. तिचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतील उतरला आहे. करीनाची नणंद सबा पतौडीनेही तिच्या या लूकवर प्रतिक्रिया देताना 'गॉर्जियस...माहशा'अल्लाह', असे लिहिलंय. करीनाची बहिण करिष्मानेही इमोजीसह आपली प्रतिक्रिया दिली आहे. करीनाचा 'जाने जान' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने साडी नेसली होती.
करीनाचा आगामी 'जाने जान' हा चित्रपट तिच्या ओटीटी पदार्पणासाठी महत्त्वाचा आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले असून त्यात विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत.
ओटीटी पदार्पणासाठी उत्सुक असलेली करीना एका निवेदनात म्हणाली की, 'मी नेटफ्लिक्सवर एका खास चित्रपटासह येण्यासाठी खूपच उत्सुक आहे. 23 वर्षांनंतर, हे नवीन लॉन्च झाल्यासारखे वाटत आहे आणि मी नव्या प्रेक्षकांना भेटणार आहे याचा आनंद आहे. यापूर्वी मला कधीही न साकारलेल्या भूमिकेत प्रेक्षक पाहतील. या चित्रपटाची कथा खूपच अनोखी आणि थरारक आहे. नेटफ्लिक्सने जगाच्या विविध भागांतील चित्रपट सर्वात अस्सल पद्धतीने दाखवले आहेत. कलाकारांसाठी त्यांनी १९० देशांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिलंय. या चित्रपटातील माझी भूमिका आजवरची सर्वोत्कृष्ठ असेल असे मला वाटतंय.'