वाराणसी - वाराणसीमध्ये अनिल शर्मा दिग्दर्शित 'जर्नी' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकरनं एका तरुणाच्या डोक्याला चापटी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर सोशल मीडियावर नानाच्या या वागण्याचा नेटिझन्सनी निषेध केला आणि त्याच्यावर टीकीही केली. भरपूर ट्रोलचा सामना केल्यानंतर नानानं फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत झालेला प्रकार गैरसमजातून घडल्याचं सांगितलंय. त्यासोबत त्यानं माफीही मागितली आहे.
नानानं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जर्नी चित्रपटाचं शूटींग वाराणसीच्या दशाश्वमेध चौकात सुरू असताना रिहर्सल सुरू होती. यामध्ये नाना पाटेकर टोक्यावर टोपी घालून रस्त्यावर गर्दीत उभे असताना एक व्यक्ती मागून येतो आणि तुझी टोपी विकायचीय का असं नानाला विचारतो, मग नानाला राग येतो आणि तो त्याला मागून थप्पड मारतो व 'बख्तमीजी मत करो चलो निकलो यहां से' म्हणतो, असा तो सीन होता. हे सर्व सर्व सुरू असताना हा मुलगा आला आणि पुढे सरकत असताना नानाला हा आपलाच माणूस वाटला आणि त्यानं त्याला टपली मारली. त्यानंतर तो मुलगा घाबरला आणि तिथून पळून गेला. जेव्हा नानाच्या लक्षात आलं की हा आपला माणूस नाही. कोणीतरी आंगतुक येऊन फोटो घेत होता. त्यानंतर नानाला त्याची माफी मागायची होती पण तो व्यक्ती तिथून निघून गेला होता.
नाना म्हणाला की, "हा एक सीनचा भाग होता. रिहर्सलमध्ये गैरसमजातून त्या व्यक्तीला मी मारलं, हे माझं चूक होतं. माझ्याकडून असं कधीही होत नाही. मी वाराणसीत गेली बेरच दिवस शूटिंग करतोय. इतकी गर्दी असतानाही आम्हाला कधीच त्रास झाला नाही. मी कधीच फोटोला नाही म्हणत नाही. इथं अनोकांसोबत मी फोटो काढलेत. किती गर्दी असते घाटावर तिथं आम्ही शूट करत असताना मला अनेक लोक भेटलेत. हा प्रकार माझ्याकडून चुकून घडलाय, तो मुलगा कुठून आला हे माहिती नाही, पण गैरसमज झाला त्याबद्दल मला माफ करा. मी कुणाला मारत नाही, आजपर्यंत असं कधी केलेलं नाही. काशीचे लोक माझ्यावर भरपूर प्रेम करतात त्यामुळे माझ्याकडून असं होणं शक्य नाही. तो समोर असता तर त्याची माफी मागितली असती. पण झालेला प्रकार गैरसमजूतीतून घडलाय, त्यामुळे त्या व्यक्तीची मी माफी मागतो."