अयोध्या- Inauguration of Shri Ram Mandir : अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. यासाठी समाजातील विविध स्तरातील लोक यामध्ये काही खेळाडू, वैज्ञानिक, सैनिक, न्यायाधीश, अशा अठरा प्रकारच्या कॅटेगरीतील लोकांना निमंत्रीत केलं जाईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी, चंपत राय यांनी दिली आहे.
क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा, सिनेजगतातील मेगास्टार अमिताभ बच्चन आणि 'रामायण' या गाजलेल्या मालिकेत राम आणि सीतेची भूमिका करणारे अभिनेता, अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया या प्रमुख व्यक्तिमत्त्वांमध्ये आहेत. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
श्रीराम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचंही श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलं. या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याबद्दलची सविस्तर माहिती देताना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी, चंपत राय म्हणाले, "भगवान श्रीरामाचं 5 वर्षाच्या बालक रुपातील दगडाच्या 4 फुट 3 इंचाच्या 3 उभ्या मूर्ती अयोध्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी बनवल्या जात आहेत. तीन कलाकार 3 वेगवेगळ्या दगडात या मूर्ती बनवत आहेत. भगवानच्या या तीनही मूर्ती जवळपास 90 टक्के तयार झाल्या आहेत आणि फक्त एक आठवड्याचं फिनिशींग बाकी आहे. याची प्रतिष्ठापना मंदिराच्या तळमजल्यावरील गाभाऱ्यात होणार आहे. मंदिराचा गाभारा आणि तळमजला तयार झाला आहे. त्यामुळे प्रतिष्ठापणा होण्यात कोणताही अडथळा नाही. पहिला मजला खूप लांब आणि रुंद आहे. जमीनीवर मार्बलचे फ्लोरींग काही भागात पूर्ण झालंय, काही ठिकाणी शिल्लक आहे. पण गाभारा तयार असल्यामुळे पहिल्या मजल्यावरील काही काम जर पूर्ण झालं नाही तरी कोणतीच अडचण होणार नाही."
या सोहळ्यासाठी देशातील 4 हजार संत, 50 देशाचे प्रतिनिधी, आणि देशाच्या महत्त्वाच्या लोकांना निमंत्रीत केलं जाणार आहे. याबद्दल सांगताना चंपक राय पुढे म्हणाले, "देशातील 4 हजार संतांना निमंत्रीत करण्यात आलंय. यादी आता तयार झाली आहे. अनेकांना व्हाट्सअपवर, जे इमेल पाहतात त्यांना इमेलवर, मोठ्या संख्येने प्रत्यक्ष भेटून आणि आतापर्यंत जवळपास 3200 संताना निमंत्रण पत्रीका पोस्टानं पाठवण्यात आल्या आहेत. पुढील 2-3 दिवसात उर्वरीत 800 संताना निमंत्रण पत्रिका पोस्टानं पाठवण्यात येतील. समाजातील विविध स्तरातील लोक यामध्ये काही खेळाडू, वैज्ञानिक, सैनिक, न्यायाधीश, अधिवक्ता, मीडिया हाऊसेस, उद्योजक, कवी, लेखक, इतर साहित्यिक, इतिहासकार, हुतात्मांचे परिवार अशा अठरा प्रकारच्या कॅटेगरीतील लोकांना यात निमंत्रीत केलं जाईल. भारताबाहेरच्या 50 देशातील एकेक प्रतिनिधींना हजर राहण्यास आमंत्रीत केलं जाणार आहे. एक खूप मोठी टीम आपआपल्या क्षेत्रातील काम पूर्ण करण्यासाठी झटत आहे.," असेही चंपक राय म्हणाले.