मुंबई - बऱ्याचदा छोट्या पडद्यावरील रियालिटी शोज मधील स्पर्धक मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना दिसतात. याचं नवीनतम उदाहरण म्हणजे नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी इंडियन आयडल मधील गायक स्पर्धक आता चित्रपटातून दिसणार आहे, अभिनेता म्हणून. आपल्या बहारदार गायकीनं इंडियन आयडल मराठीचा मंच गाजवणारा जगदीश चौहान ‘विजयी भव' या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. गायनात तरबेज असणारा जगदीश इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला आहे. खऱ्या अर्थानं जगदीशच्या गायनशैलीचा कस लावणाऱ्या या शोमध्ये तो उपविजेता ठरला होता. सर्वत्र कौतुक झालेल्या जगदीशनं आता अभिनय क्षेत्रात विजयी होण्यासाठी 'विजयी भव' हा मंत्र जपत मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.
खेळ आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा 'विजयी भव' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणाच्या पटलावर रंगलेला कबड्डीचा डाव 'विजयी भव' या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यामुळं केवळ खेळ एके खेळ असं चित्र यात दिसणार नसून, राजकारणातील डावपेचही 'विजयी भव'मध्ये असणार यात शंका नाही. या चित्रपटाची कथा जगदीश पवार यांनी लिहिली असून, पटकथा अतुल सोनार यांची आहे. मुकुंद महाले यांनी अतुल सोनार यांच्या साथीनं संवादलेखन केलं आहे. गीतकार विरेंद्र रत्ने यांनी लिहिलेली आणि जगदीश चौहान, कविता राम, मंजिमा गोस्वामी, वैशाली माडे, नूरा सिंग आडे, स्वप्नाली चौहान यांनी गायलेली गीतं संगीतकार कबीर शाक्या यांनी संगीतबद्ध केली आहेत.