मुंबई - अकादमी पुरस्कार 12 मार्च 2023 रोजी होणार आहेत. अशा परिस्थितीत जगभरातील चित्रपट ऑस्करसाठी निवडले जाणार आहेत, तर काहींना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. 12 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत सर्व कॅटेगिरीसाठी मतदान होणार असून 24 जानेवारी रोजी नामांकन जाहीर केले जाईल. दक्षिणेतील चित्रपट 'आरआरआर' आणि गुजराती चित्रपट 'चेल्लो शो' भारताकडून ऑस्करसाठी गेले आहेत. त्याचवेळी 'कंतारा' हा कन्नड चित्रपटही शेवटच्या क्षणी नामांकनासाठी पाठवण्यात आला आहे. यासोबतच 'जॉयलँड' हा लॉलीवूड (पाकिस्तानी चित्रपट ) चित्रपटही ऑस्करसाठी गेला आहे. अशा स्थितीत ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारत-पाक आमनेसामने आले आहेत, कारण भारत - पाकचे हे चित्रपट एकाच श्रेणीत निवडले गेले आहेत.
गुरुवारी (22 डिसेंबर) अकादमीने 95 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या 10 श्रेणींची घोषणा केली. यामध्ये पाक चित्रपट 'जॉयलँड' 15 चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत निवडला गेला आहे. या श्रेणीमध्ये 92 देशांतील विविध चित्रपटांची यादी तयार करण्यात आली आहे. 'जॉयलँड' सोबतच भारताचा गुजराती चित्रपट 'चेल्लो शो' देखील या श्रेणीत निवडला गेला आहे. आता याला ऑस्कर सोहळ्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठी लढत म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे ऑस्करसाठी जाणारा 'जॉयलँड' हा पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 20 वर्षांनंतर, भारतातून या श्रेणीमध्ये एका चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. यापूर्वी सुपरस्टार आमिर खानच्या 'लगान' या चित्रपटाला या श्रेणीत नामांकन मिळाले होते, मात्र आपल्या पदरी निराशा आली होती. येथे, दक्षिणेकडील ब्लॉकबस्टर चित्रपट 'आरआरआर' मधील नाटू-नाटू या हिट गाण्याला मूळ गाण्याच्या श्रेणीत भारताकडून ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.