मुंबई - तब्बल चार वर्षांनंतर आमिर खान लाल सिंग चड्ढा मार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचा आधीचा ठग्स ऑफ हिंदुस्थान बॉक्स ऑफिसवर आपटला होता, त्यामुळे लाल सिंग चड्ढाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. बऱ्याच कालावधीनंतर आमिर मोठ्या पडद्यावर येत असल्यामुळे त्याच्या भावना काय आहेत असे आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी विचारल्यावर आमिर खान उत्तराला, “माझ्यात एक्ससाईटमेन्ट, धाकधूक, कॉन्फिडन्स अशा अनेक संमिश्र भावनांचे मिश्रण आहे. आम्ही खूप इमानदारीने चित्रपट बनविला आहे आणि प्रेक्षकांना तो आवडावा याच उद्देशाने बनविला आहे. आम्ही त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरू हा कॉन्फिडन्स जरूर आहे परंतु नेहमीप्रमाणे थोडीफार धाकधूक नक्कीच आहे. आणि अशी धाकधूक मला माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी असते. तुम्हाला माहीतच असेल की लाल सिंग चड्ढा टॉम हँक्स अभिनित हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पवर आधारित आहे. आम्ही त्याचे भारतीयीकरण केले असून तो संपूर्णतः कौटुंबिक चित्रपट आहे. संपूर्ण फॅमिली एकत्र बसून हा चित्रपट बघू शकेल याची ग्वाही मी देतो. अभिनेता अतुल कुलकर्णीने याचे रूपांतर केले असून ते अप्रतिम झाले आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, फॉरेस्ट गम्प हा माझा निवडक आवडीच्या चित्रपटांपैकी एक आहे आणि अतुलने मला सांगितले की त्याने त्यावर आधारित संहिता लिहिली आहे. खरंतर ओरोजिनल चित्रपट क्लासिक आहे आणि अतुलने पहिल्यांदाच सिनेमासाठी लिखाण केलं आहे. मी साशंक होतो की संहिता चांगली असेल की नाही त्यामुळे अतुलने अनेकदा सांगूनही ती ऐकण्याचे मी टाळत होतो. अतुल माझा जुना मित्र आहे आणि जर का मला स्क्रिप्ट आवडली नसती तर तसे त्याला सांगणे मला अवघड गेले असते म्हणून मी टाळत होतो. तब्बल दोन वर्षांनंतर मी ती ऐकली आणि चाट पडलो. लिखाण इतकं सुरेख होत की मी त्याच्या प्रेमात पडलो आणि लाल सिंग चड्ढा बनविण्याचे नक्की झाले.”
नवोदित दिग्दर्शकाने केली कमाल - दिग्दर्शक अद्वैत चंदन सारख्या नवोदित दिग्दर्शकाकडे दिग्दर्शनाची जबाबदारी टाकण्याबाबत आमिर म्हणाला, “हो, अद्वैत नक्कीच नवीन दिग्दर्शक आहे परंतु त्याने सिक्रेट सुपरस्टारचे दिग्दर्शन कमालीचे केले होते. त्यामुळे त्याचा विचार झाला. परंतु मी त्याला सांगितलं की हा एक कठीण चित्रपट आहे त्यामुळे तू काही ७-८ सीन्स दिग्दर्शित करून आम्हाला दाखव आणि त्यानंतर आम्ही फायनल डिसिजन घेऊ. आम्ही त्याला थोडे कठीण सीन्स दिग्दर्शित करायला सांगितले जेणेकरून त्याची दिग्दर्शनीय परिपक्वता तपासता येईल. त्याने त्याप्रमाणे केले आणि त्याने कमाल काम केले होते. अजून एक गंमतीची गोष्ट. माझा मुलगा जुनैद नुकताच अमेरिकेतून अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन परतला होता. मी अद्वैतला सांगितले की जुनै ला लाल सिंगच्या भूमिकेत घेऊन सीन्स करून घे. थोडक्यात माझा मुलगा नक्की काय शिकून आलाय आणि अद्वैत इतका कठीण चित्रपट हाताळू शकेल की नाही या दोन्ही गोष्टींचा शहानिशा होणार होता. तुम्हाला सांगतो की अद्वैतने सीन्स सुंदररित्या दिग्दर्शित केले होतेच परंतु लाल सिंग चड्ढाच्या भूमिकेत जुनैदने अफलातून काम केले होते. मी आणि किरण (राव) यांनी त्या ऑडिशन्स बघितल्या आणि चाटच पडलो. जुनैद ती भूमिका जगतोय अशी आमची धारणा झाली. मी तर किरणला बोललो की मी इतक्या ताकतीने ही भूमिका आता करूच शकणार नाही. ते कदाचित पितृप्रेम असेल पण अनेकांनी मला हेच सांगितले की जुनैद ही भूमिका जगलाय आणि त्यालाच या भूमिकेत घ्या.”
आमिरने भूमिका का केली ? - मग या चित्रपटात अभिनेता आमिर खानची एंट्री कशी झाली या प्रश्नावर आमिर ने उत्तर दिले की, “त्यातही एक गंमत आहे. आम्ही जुनैदची ऑडिशन अनेकांना दाखविली आणि सगळ्यांचेच मत पडले की जुनैदनेच लाल सिंग चड्ढाची भूमिका करावी. मी ती भूमिका करणार होतो म्हणून सहा महिने दाढी वाढविली होती आणि ती भरपूर वाढलेली होती. सर्वांचेच मत पडत होते की जुनैदने लाल सिंग अफलातून पद्धतीने सादर केलाय. माझीदेखील खात्री होती की जुनैदने मी करू शकेन त्यापेक्षा उत्तम काम केले आहे आणि त्यालाच घेऊन हा चित्रपट बनवायला हवा. त्यामुळे मी माझी वाढविलेली दाढी कापून टाकली. परंतु दोन लोक या निर्णयाविरोधात होते. ते म्हणजे आदित्य चोप्रा आणि अतुल कुलकर्णी. त्यांच्या मते ही भूमिका खूप कठीण आहे आणि ती एका नवोदिताने करू नये. या चित्रपटाचा आवाका आणि भूमिकेचा कॅनवास मोठा आहे त्यामुळे माझ्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यानेच ही भूमिका साकारायला हवी अशी त्यांची धारणा होती. मला आणि माझ्या टीमला हे पटले. आणि जुनैद देखील मला म्हणाला होता की त्याच्यासारख्या नवोदितासाठी इतक्या मोठ्या बजेटची फिल्म बनविणे धोक्याचे आहे. त्यामुळे लाल सिंग चड्ढामध्ये माझी अभिनेता म्हणून एंट्री झाली.”