मुंबई - Who is the father of Ileana DCruzs baby : आपल्या खासगी आयुष्याबद्दल मौन बाळगून राहणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझनं पहिल्यांदाच आपल्या बाळाच्या वडिलांचा फोटो शेअर करुन चाहत्यांना धक्का दिलाय. शनिवारी सकाळी तिनं हे मान्य केलं की तिचा मुलगा कोआ फिनिक्स डोलनला ती एकटी वाढवत नाही आणि 'बाळाचा बाप कोण?' हे सांगणारा, तिच्या मिस्ट्री मॅनसोबत एक फोटो शेअर केला.
इलियानानं चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर एक संवाद सत्र आयोजित केलं होतं. यावेळी एका चाहत्यानं तिला विचारलं की, "तुम्ही एकटी तुमच्या मुलाला कसे हाताळता?'' या प्रश्नाचे उत्तर देताना, इलियानानं तिच्या जोडीदाराचा फोटो शेअर केली आणि लिहिलं, "मी नाही."
इलियानाला 1 ऑगस्ट रोजी मुलगा झाला आणि काही दिवसानंतर तिनं आपल्या मुलाचं नाव चाहत्यांना सांगितलं होतं. तिनं 5 ऑगस्ट रोजी बाळाचा एक छान फोटो शेअर करून आपल्या पहिल्या मुलाची ओळख करून दिली होती. 'कोआ फिनिक्स डोलन' असं नाव असलेलं हे बाळ फोटोत झोपलेलं दिसत होतं. फोटो शेअर करुन आई इलियानानं लिहिलं होतं, "आमच्या लाडक्या मुलाचं या जगात स्वागत करताना आम्ही किती आनंदी आहोत हे शब्दात सांगू शकत नाही. हृदय पूर्ण भरलं आहे."
इलियानाला दुसऱ्या एका चाहत्यानं विचारलं, "तुम्ही गरोदर आहात हे जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?" प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, " एक वर्षापूर्वी मला कळलं की मी गरोदर आहे आणि हा सर्वात अविश्वसनीय भावनिक क्षण होता. आजही मी माझ्या मुलाला घेते तेव्हा विश्वासच बसत नाही. हे एक खूपच स्वप्नमय वाटत राहतं."
याआधी इलियानानं तिच्या पार्टनरसोबत डेट नाईटचे फोटो शेअर केले होते. यामध्ये इलियाना एका सुंदर स्ट्रॅपी लाल ड्रेसमध्ये दिसली होती, तर तिच्या जोडीदाराने डेट नाईटसाठी काळा शर्ट आणि ट्राउझर्स निवडलं होतं. कोलाज शेअर करताना तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लाल हार्ट इमोजीसह "डेट नाईट" असं लिहिलं होतं. आता इलियानानं पोस्ट केलेला बाळाच्या बापाचा फोटो अर्थातच त्या डेट नाईटमधील व्यक्ती वाटतेय.
गरोदरपणाच्या काळात इलियानानं तिच्या गूढ पार्टनरसोबतचा स्वतःचा एक रंगीबेरंगी अस्पष्ट फोटो शेअर केला होता आणि गरोदरपणाच्या आनंदावर एक गोड टीप दिली होती. तिनं लिहिलं होतं, "गरोदर असणं हा एक सुंदर सुंदर आशीर्वाद आहे... मला वाटलं नव्हते की मी इतका भाग्यवान आहे की मी हे कधी अनुभवू शकेन, म्हणून मी या प्रवासाची अनुभूती घेतेय त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. तुमच्या पोटात एक जीव आकाराला येतोय हे किती सुंदर वाटतं हे सांगण अवर्णनीय आहे."