मुंबई- अभिनेत्री इलियाना डिक्रूझ गर्भवती असून आई होण्याच्या आनंद ती साजरा करताना दिसते. अनेकदा आपल्या बेबी बंप आणि प्रेग्नेंसी ग्लोची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. शुक्रवारी तिने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशन आयोजित केले होते. त्यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला अनेक विषयावर बोलते केले. चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना तिने मोकळेपणाने उत्तरेही दिली.
एका चाहत्याने तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाबद्दल विचारले, त्याला उत्तर देताना इलियाना डिक्रूझ म्हणाली, 'प्रामाणिकपणे सांगते की, या प्रवासाबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे परंतु जर मला एका शब्दात सांगायचे असेल तर - हंबलिंग.' दुसऱ्या एकाने तिला विचारले की, 'याकाळात सर्वात जास्त काय खायला आवडते, आईस्क्रिम की पिझ्झा?' उत्तर देताना ती म्हणालीकी खरं सांगायचे तर, 'फक्त चांगले जुने भारतीय खाद्यपदार्थ! काही काळापासून बटर चिकन आणि नान खाल्लं नाही. बॉम्बे मधील अन्न मिस करतेय.' एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देखील तिने दिले, 'तुम्ही तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकले तेव्हा तुम्हाला काय वाटले?'
याचे वर्णन तिने 'सर्वात सुंदर क्षणांपैकी एक' असे केले. ती म्हणाली, 'मी अनुभवलेल्या सर्वात सुंदर क्षणांपैकी हा एक होता. मी किती भारावून गेले होते याचे वर्णनही करू शकत नाही. यात अश्रू, आनंद आणि खूप दिलासा होता. एका लहानशा बीजावर प्रेमाची प्रचंड लाट जे लवकरच पूर्ण वाढलेले बाळ होणार आहे.' इलियाना एक सक्रिय सोशल मीडिया वापरकर्ती आहे आणि तिच्या प्रेग्नेंसी डायरीतील झलक तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
सुरुवातीपासूनच इलियाना तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अत्यंत अबोल राहिली आहे. इलियाना कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल याला डेट करत असल्याचे यापूर्वीच्या अनेक बातम्यातून सांगण्यात आले होते. मालदीवमध्ये विकी कौशल आणि कॅटरिना कैफसोबत सुट्टी घालवताना दिसल्यानंतर दोघांच्या नात्याच्या अफवा पसरल्या होत्या. या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत जाहीर केलेले नाही.